व्यवहार चलन पद्धतीने व्हावेत : इलेक्‍ट्रिक व्यापाऱ्यांची मागणी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 मे 2018

पुणे : 'पन्नास हजार रुपयांवरील व्यवहारांसाठी करण्यात आलेल्या ई-वे बिलाच्या सक्तीने व्यापाऱ्यांना त्रास होत असून, किमान एका शहरातील दोन व्यापाऱ्यांमधील व्यवहार या पद्धतीने न होता चलन पद्धतीने व्हावेत', अशी अपेक्षा 'पुणे इलेक्‍ट्रिक असोसिएशन (तपकीर गल्ली)' आणि 'पूना इलेक्‍ट्रिक अँड इलेक्‍ट्रॉनिक्‍स असोसिएशन'च्या सदस्यांनी 'सकाळ' कार्यालयातील बैठकीत व्यक्त केली. 

पुणे : 'पन्नास हजार रुपयांवरील व्यवहारांसाठी करण्यात आलेल्या ई-वे बिलाच्या सक्तीने व्यापाऱ्यांना त्रास होत असून, किमान एका शहरातील दोन व्यापाऱ्यांमधील व्यवहार या पद्धतीने न होता चलन पद्धतीने व्हावेत', अशी अपेक्षा 'पुणे इलेक्‍ट्रिक असोसिएशन (तपकीर गल्ली)' आणि 'पूना इलेक्‍ट्रिक अँड इलेक्‍ट्रॉनिक्‍स असोसिएशन'च्या सदस्यांनी 'सकाळ' कार्यालयातील बैठकीत व्यक्त केली. 

पुणे इलेक्‍ट्रिक असोसिएशनचे (तपकीर गल्ली) उपाध्यक्ष हरिष कुकरेजा, सचिव हेमंत शहा, मुकेश जेठवानी, सचिन तलरेजा, पूना इलेक्‍ट्रिक अँड इलेक्‍ट्रॉनिक्‍स असोसिएशनचे उपाध्यक्ष भरत शहा, सचिव तरुणकुमार पटेल, किशोर ओसवाल, विलास शहा तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. 

ई- वे बिल पद्धतीने व्यापाराचा वेग मंदावत असून अनेक बाबींविषयी गोंधळ होतो आहे. संबंधित पोर्टलवर नोंदविलेल्या या बिलामध्ये टेंपोचा क्रमांक टाकावा लागतो आणि तो टेंपो बंद पडला तर जुने बिल रद्द करून नवे बिल करावे लागते. बिल रद्द करण्याचा अधिकार विक्रेत्याला नसतो, तर खरेदीदाराला ते रद्द करावे लागते. माल मिळालेला नसतानाही त्याला बिल रद्द करण्याची प्रक्रिया अनेकदा करावी लागते. व्यापाऱ्यांकडे नेट नसणे, वेबसाइट हॅंग होणे, असे अनुभवही येत आहेत. त्यामुळे एकाच शहरातील व्यवहारांना या नियमातून मुक्त करावे, अशी मागणी प्रतिनिधींनी केली. 

तपकीर गल्ली आणि बुधवार पेठेतील वाहतुकीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी झेब्रा पट्टे, समांतर पार्किंग आदी उपाय गरजेचे आहेत. व्यापाऱ्यांनी पदपथासाठी दिलेल्या दुकानासमोरील एक फूट जागेवर सध्या रस्त्यावरील विक्रेत्यांचे अतिक्रमण झाले आहे. दुकानांच्या परिसरातील स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. चौकातील उघड्यावरील कचऱ्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत असल्याची तक्रारही या पदाधिकाऱ्यांनी केली. 

भारतीय वस्तूंची मागणी वाढली 
''इलेक्‍ट्रॉनिक्‍स मार्केटमधील चिनी वस्तूंची विक्री कमी झाली असून, भारतीय बनावटीच्या वस्तूंची विक्री वाढली आहे. तसेच एलईडी दिव्यांचा खप वाढला आहे. ग्रामीण भागातही ब्रॅंडेड वस्तूंची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. मार्केटमधील इतर देशांच्या तुलनेत भारतीय ब्रॅंडच्या वस्तूंचे प्रमाण वाढले आहे,'' असे या व्यापाऱ्यांनी सांगितले.

Web Title: eway bill creating problems for traders, says its association