घरात घडलेल्या घटनेमुळे माजी सैनिकाने ग्रामस्थांसाठी केली रुग्णवाहिकेची सोय

रुपेश बुट्टेपाटील
Tuesday, 6 October 2020

जवळच्या नातेवाईकांमधील एकाचे वेळेत उपचार न मिळाल्याने दुर्दैवी निधन झाल्यावर अन्य कोणावर अशी वेळ येऊ नये आणि आजारी माणसाला वेळेवर उपचार मिळावे यासाठी शिंदेगाव (ता. खेड) येथील निवृत्त सैनिक दत्तात्रेय रामभाऊ टेमगिरे यांनी स्वखर्चाने चाकण औद्योगिक भागात रुग्णवाहिका सेवा उपलब्ध केली आहे.

आंबेठाण : जवळच्या नातेवाईकांमधील एकाचे वेळेत उपचार न मिळाल्याने दुर्दैवी निधन झाल्यावर अन्य कोणावर अशी वेळ येऊ नये आणि आजारी माणसाला वेळेवर उपचार मिळावे यासाठी शिंदेगाव (ता. खेड) येथील निवृत्त सैनिक दत्तात्रेय रामभाऊ टेमगिरे यांनी स्वखर्चाने चाकण औद्योगिक भागात रुग्णवाहिका सेवा उपलब्ध केली आहे.

एखाद्या सैनिकांत देशाच्या सेवेबरोबर सामाजिक जबाबदारी किती भरलेली असते हे यातून अधोरेखित होत आहे. एका माजी सैनिकाने सुरू केलेल्या या परोपकारी वृत्तीचे समाजाच्या विविध स्तरातून कौतूक केले जात आहे.

सध्या जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून काही प्राथमिक आरोग्य केंद्राना रुग्णवाहिका देण्यात येत आहे. त्यावरून जिल्ह्यात विशेषतः आंबेगाव तालुक्यात राजकारण रंगले आहे. परंतू येथे मात्र स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून गरजूंना आरोग्यसेवा देण्याचे काम टेमगिरे करीत आहे. एकीकडे मोठेपणा दाखविण्यासाठी चालविलेला प्रयत्न तर दुसरीकडे निस्वार्थ भावनेने सुरू केलेले काम असा फरक या कामातून जाणवत आहे.

चाकण औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक दोन मध्ये मोठ्या प्रमाणात कारखाने उभे राहिले आहे. या भागात काही दुर्घटना अथवा अपघात घडला तर बऱ्याच वेळा रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही. विविध कंपन्यात जरी रुग्णवाहिका असली तरी कंपनी नियमांमुळे ती सर्वसामान्य नागरिकांना सहजपणे उपलब्ध होत नाही. त्यामुळे अनेक वेळा वेळेत उपचार न झाल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. एमआयडीसी लगत ग्रामीण भाग असल्याने आजही नागरिकांना पिक अप सारख्या गाड्यांचा आधार घेत दवाखान्यात जावे लागत आहे. त्यामुळे ही सुरू केलेली रुग्णवाहिका सेवा अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टेपाटील, भाजपचे तालुका उपाध्यक्ष सुनिल देवकर, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष काळूराम पिंजण, सागर मुळे, मनोज टेमगिरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत ही रुग्णवाहिका सेवेसाठी रुजू करण्यात आली.

आपला भाग औद्योगिकीकरणात कितीही पुढे गेला तरी नागरिकांना सहज आणि वेळेत उपचार मिळावे मिळण्यासाठी माजी सैनिक दत्तात्रय टेमगिरे यांनी स्वखर्चातून जवळपास आठ लाख रुपये खर्च करून ही रुग्णवाहिका सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शिंदे गाव येथे माझे कुटुंब माझी जबाबदारी या अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या गावपातळीवरील आरोग्य तपासणी मोहिमेसाठी ही रुग्णवाहिका सुरू करण्यात आली.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ex-servicemen provide ambulance service to the villagers