माजी विद्यार्थी ही संस्थेची ताकद - प्रतापराव पवार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 एप्रिल 2019

समाजासाठी मदत केली पाहिजे
विनोद जाधव म्हणाले, ‘‘समाजहितासाठी दिलेले पैसे गरजूंपर्यंत पोचतात की नाही, याबाबत शंका असल्याने लोक मदत करीत नाहीत. मात्र ज्यांच्याकडे पैसे आहेत, त्यांनी मदत केलीच पाहिजे. माझी मुले म्हणतात की, तुम्ही गेल्यानंतर तुमची संपत्ती आम्हाला नको, तुम्ही ती दान करा. कारण आम्ही सक्षम आहोत. निधनानंतर आपले अस्तित्व राहावे म्हणून मी हा निधी देत आहे. वसतिगृहाचा फायदा झालेल्या १० टक्के विद्यार्थ्यांनी समाजसेवा केली तरी त्याचा चांगला परिणाम होऊ शकतो.’

पुणे - ‘माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन एक कोटी रुपयांचा निधी संकलित केला. हा संस्थेच्या दृष्टीने मोठा क्षण आहे. संस्थेच्या कामकाजात माजी विद्यार्थ्यांचा सहभाग आणि आत्मीयता हीच संस्थेची खरी ताकद असते,’’ असे मत ‘सकाळ’ आणि विद्यार्थी सहायक समितीचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी व्यक्त केले. 

विद्यार्थी सहायक समितीच्या माजी विद्यार्थ्यांनी तांबोळी प्रेरणा निधीअंतर्गत समितीसाठी एक कोटी रुपयांचा निधी संकलित केला आहे. तो समितीकडे सुपूर्त करण्यात आला. दुबईस्थित उद्योजक विनोद जाधव हे समितीच्या नवीन वसतिगृहासाठी पाच कोटी रुपये देणार असल्याच्या सामंजस्य करारावर या वेळी स्वाक्षरी करण्यात आली. समितीचे विश्‍वस्त रमाकांत तांबोळी, भाऊसाहेब जाधव, कार्यकारी विश्‍वस्त तुकाराम गायकवाड, माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत कुलकर्णी, खजिनदार दिनकर वैद्य या वेळी उपस्थित होते. 

पवार म्हणाले, ‘‘समितीच्या माजी विद्यार्थ्यांनी नेहमीच संस्थेच्या हितासाठी काम केले आहे. शिक्षणासाठी ग्रामीण भागातून पुण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा निर्माण करण्यासाठी या निधीची मदत होईल. निधीचा विनियोग योग्य प्रकारे केला जाईल.’’ 

तांबोळी म्हणाले, ‘लोकांना चांगल्या कामासाठी पैसे द्यायचे आहेत. मात्र आपण त्यांच्यापर्यंत पोचलो पाहिजे. १० कोटी रुपयांचा निधी उभारण्याचे ध्येय आहे.’’  गायकवाड, भाऊसाहेब जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सुप्रिया केळवकर यांनी केले. आभार जीभाऊ शेवाळे यांनी मानले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ex Students Organisation Power Prataprao pawar