परीक्षेतील गैरप्रकारावर शिक्कामोर्तब

Exam
Exam

पुणे - झील एज्युकेशन सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात संचालकांच्या पत्नीचा पेपर त्याच महाविद्यालयातील प्राध्यापकांनी सोडविल्याचा प्रकार काही महिन्यांपूर्वी घडला होता. यासंदर्भात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल सोमवारी सादर करण्यात आला. परीक्षेत गैरप्रकार घडल्याचे समितीच्या प्रथमदर्शनी निर्दशनास आले आहे, त्यानुसार विद्यापीठाकडून फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. त्याचबरोबर महाविद्यालयावर नवीन विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई केली जाईल, असे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

झील एज्युकेशन सोसायटीतील अभियांत्रिकी महाविद्यालयात संस्थेच्या संचालकांच्या पत्नीचे पेपर त्या महाविद्यालयांत प्राध्यापकांनी सोडविल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. याप्रकरणी पेपर सोडवून देणाऱ्या प्राध्यापकानेच विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. या संस्थेतील माजी कर्मचारी योगेश ढगे यांनी या तक्रारीचा सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी कुलगुरूंनी एक समिती केली होती. मात्र त्याला चार महिने उलटले तरी समितीकडून जबाब नोंदविण्यापलीकडे काहीच कार्यवाही झाली नाही. या दिरंगाई विरोधात ढगे यांच्यासह संस्थेतील एका विद्यार्थ्याने विद्यापीठातील मुख्य इमारतीसमोर गेल्या चार दिवसांपासून उपोषण सुरू केले होते. अखेर समितीची कार्यवाही पूर्ण करून अहवाल परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाकडे सादर केला. परीक्षा मंडळाने हा अहवाल स्वीकारला असून, यामध्ये परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे संबंधितांवर फौजदारी कारवाई तसेच नवीन विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई केली जाईल, असे विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी सांगितले.

समितीमधील गोंधळाचा जाब द्या
‘‘विद्यापीठाने नेमलेल्या चौकशी समितीतील सदस्यांनी काही दिवसांपूर्वी राजीनामे दिले होते, तरीही त्यांना परत समितीत घेण्यात आले. समितीबाबत झालेल्या गोंधळाचा जाब कोणी विचारणार आहे का नाही,’’ असा प्रश्‍न संस्थेच्या प्रतिनिधींनी आपली बाजू मांडताना उपस्थित केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com