बारावीची आजपासून परीक्षा; विद्यार्थ्यांसाठी टिप्स

बारावीची आजपासून परीक्षा; विद्यार्थ्यांसाठी टिप्स

पुणे : आयुष्यातील "टर्निंग पॉइंट' समजली जाणारी बारावीची परीक्षा उद्यापासून (ता. 21) सुरू होत आहे. त्यामुळे मनावर थोडा ताण असेलच. पण, ही शैक्षणिक परीक्षा आहे, आयुष्याची नव्हे. त्यामुळे आनंदाने सामोरे जा. अभ्यासाचे योग्य नियोजन करा म्हणजे अवघड वाटणारी परीक्षा अगदीच सोपी होऊन जाईल. परीक्षा असली म्हणजे सतत अभ्यास, असा अर्थ नाही. म्हणूनच परीक्षेच्या काळात कोणती काळजी घ्यावी, याच्या विद्यार्थ्यांसाठी टिप्स... 

परीक्षेला जाताना 

परीक्षेला जाताना वाहतूक कोंडीचा विचार करून घरातून लवकर बाहेर पडा. वेळेपूर्वी अर्धा तास केंद्रात उपस्थित राहणे बंधनकारक आहे. तसेच, प्रवेशपत्र महत्त्वाचे आहे. त्याबरोबरच शाळेचे ओळखपत्रही जवळ ठेवा. पेन, पेन्सिल, शार्पनर, मोजपट्टी, कंपास, खोडरबर, पॅड, पाण्याची बाटली, घड्याळ, हे साहित्य बरोबर घेऊन जा. कोणतेही पुस्तक आणि मोबाइल, इलेक्‍ट्रॉनिक साहित्य परीक्षागृहात नेण्यास मनाई आहे. 

परीक्षा देताना 

परीक्षेची प्रश्‍नपत्रिका हाती येण्यापूर्वी मन शांत ठेवा. प्रश्‍नपत्रिका वाचल्यानंतर प्रश्‍न अवघड वाटत असतील, तर गडबडून जाऊ नका. प्रश्‍न सोपे वाटत असतील, तर घाई करू नका. शांत मनाने, आत्मविश्‍वासाने प्रश्‍न सोडवा. उत्तरपत्रिकेवर सुवाच्च अक्षरात सर्व माहिती भरा, ती अचूक असल्याची खात्री करा. बारकोड चिकटवण्यापूर्वी तो आपलाच असल्याची खात्री करा. निळ्या किंवा काळ्या शाईच्याच पेनाचा वापर करा. 

परीक्षेच्या काळात 

बारावीची परीक्षा देण्यासाठी अभ्यासाचे नियोजन करा. अभ्यासात खंड आणि विरंगुळाही हवा. परीक्षेचा काळ असला, तरी व्यायाम विशेषत: चलव्यायाम महत्त्वाचा आहे. यामुळे मनाला तजेला राहतो आणि नैराश्‍यही दूर होते. त्यामुळे दररोज व्यायाम करा. आहार हलका घ्या. पहाटेपासून अभ्यासाला सुरवात केली, तर उत्तम; परंतु या काळात पुरेशी झोपदेखील आवश्‍यक असते. अनावश्‍यक जागरण करून अभ्यास करणे टाळा. आकृत्या, नकाशे, तक्ते लक्षात राहण्यासाठी सराव महत्त्वाचा आहे. 

आई-बाबांसाठी दोन शब्द

परीक्षेच्या काळात पालकांनी पाल्याबरोबर सुसंवाद ठेवावा. जास्त गुणांची अपेक्षा लादू नका. इतर मुलांबरोबर त्यांची तुलना करू नका. घरातील वातावरण कोणत्याही वादाविना प्रफुल्लित ठेवा. आपला पाल्य परीक्षेचा ताण घेतो आहे, याचा अंदाज घ्या. त्याच्याशी सकारात्मक विषयांवर बोला. अभ्यास कर म्हणून सारखे त्याला सांगू नका. अभ्यास करताना त्याला प्रश्‍न अवघड वाटत असेल वा अडचण येत असेल, तर मदत करा. त्याच्या आरोग्याची काळजी घ्या. परीक्षा केंद्रावर तो वेळेपूर्वी पोचेल, याची काळजी घ्या. 

- प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकेतील सूचना काळजीपूर्वक वाचा. 
- सोपे प्रश्न आहेत म्हणून जास्त लिहू नका, विचारले तेच लिहा. 
- पेपरचा कालावधी मनात ठेवा, त्यानुसार लिखाण वेळेत पूर्ण करा. 
- प्रश्नांचा क्रमांक अथवा उपप्रश्न क्रमांक ठळक अक्षरात ठेवा. 
- उत्तरपत्रिकेवर उत्तरांव्यतिरिक्त अन्य कोणताही मजकूर लिहू नका. 
- परीक्षेच्या काळात आरोग्य महत्त्वाचे म्हणून हलका आहार घ्यावा. 
- अभ्यास करीत असला, तरी व्यायामही करा. नैराश्‍य येणार नाही. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com