आजीला तपासणीसाठी घरी बोलावून केले डॉक्टरचे अपहरण; सूत्रधाराला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime
आजीला तपासणीसाठी घरी बोलावून केले डॉक्टरचे अपहरण; सूत्रधाराला अटक

आजीला तपासणीसाठी घरी बोलावून केले डॉक्टरचे अपहरण; सूत्रधाराला अटक

शिरूर: आजी आजारी असल्याची बतावणी करून तीला तपासायला घरी नेण्याचा बहाणा करून सातजणांनी येथील एका डॉक्टरचे अपहरण केले. मारहाण करून त्यांच्याकडून सुमारे तीन लाख रूपयांची खंडणी वसूल केल्यानंतर त्यांना सोडून दिले. शुक्रवारी (ता. ४) मध्यरात्री घडलेल्या या गंभीर घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून यातील मुख्य सूत्रधाराला गजाआड केले.

हेही वाचा: किरीट सोमय्या हल्ला : शिवसेना शहराध्यक्षांसह ६० ते ७० जणांवर गुन्हा दाखल

कुणाल सुभाषसिंग परदेशी (वय २५, रा. शिरूर) असे अटक केलेल्या मुख्य सूत्रधाराचे नाव असून, त्याला शिरूर न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सतीश, मयुर, राहुल, यश, दानिश, (पूर्ण नाव व पत्ता समजू शकले नाही) यांच्यासह त्याच्या इतर साथीदारांचा शोध घेण्यासाठी पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत. येथील डॉ. संदीप तुळशीराम परदेशी (वय ५९, रा. मारूती आळी, शिरूर) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली असून, त्यांच्या फिर्यादीनूसार शिरूर पोलिस ठाण्यात कुणाल परदेशी याच्यासह त्याच्या साथीदारांविरूद्ध आज अपहरण व खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास डॉ. परदेशी यांना त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधून 'तुम्ही कुठे आहात', अशी विचारणा काहींनी केली. त्यानंतरही दोन - तीन वेळा संपर्क साधण्यात आला. डॉ. परदेशी यांचे येथील बसस्थानकानजीक हॉस्पिटल असून, ते हाॅस्पिटल मधे असताना रात्री नऊच्या सुमारास दोन तरूण हॉस्पिटलमध्ये आले. 'आजी आजारी असल्याने तपासायला घरी चला',असे म्हणून त्यांनी डॉ. परदेशी यांना आपल्या सोबत येण्याची विनंती केली. डॉ. परदेशी हे स्वतःच्या दूचाकीवरून त्यांच्या मोटारीच्या मागे जात असताना, सिद्धार्थ नगर जवळ दोघा तरूणांनी मोटार थांबवून डॉक्टरांना आपल्या मोटारीत बसण्यास बजावले. त्यांनी विरोध केला असता कोयत्याचा धाक दाखवून मोटारीत बसविले. त्यानंतर घोडनदी किनारी नेले. तेथे आणखी चार ते पाचजण होते.

हेही वाचा: सोमय्यांनी आरोप केलेले लोक जेलऐवजी भाजपात कसे? - रूपाली पाटील ठोंबरे

त्यांनी मारहाण करून डॉ. परदेशी यांना शिरूर - न्हावरे रस्त्यावरील कर्डे घाटात नेले. तेथे संबंधित तरूणांनी त्यांच्याकडे एक कोटी रूपयांची मागणी केली. मात्र, त्यांनी असमर्थता दर्शवताच त्यांना मारून टाकण्याची धमकी देत मारहाण केली. खिशातील १५ हजार रूपये काढून घेतले. दरम्यान, डॉ. परदेशी यांनी पन्नास हजार रूपये देतो मला सोडा असे म्हणून आपल्या मोटारीच्या चालकाला कर्डे घाटात पन्नास हजार रूपये घेऊन बोलावले असता, अपहरणकर्त्यांनी पुन्हा त्यांना मोटारीत बसवून पुणे - नगर रस्त्याने सतरा कमानीच्या पुलाच्या दिशेने नेले. तेथे नेल्यावर पुन्हा पैशांची मागणी केली असता, डॉ. परदेशी यांनी चालकाला फोन करून तीन लाख रूपयांची जमवाजमव करायला सांगितले. ते पैसे अपहरणकर्त्यांनी आपल्या एका साथीदाराकडे देण्यास सांगितले व शिरूर बायपास नजीक डॉ. परदेशी यांना सोडून दिले. दरम्यान, काल रात्री उशीरा डॉ. परदेशी यांनी हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आणल्यानंतर पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, पोलिस निरीक्षक किरण उंदरे यांनी घटनेची गांभीर्याने दखल घेत संशयितांच्या मागावर पोलिस पथके रवाना केली. प्रथमदर्शनी मिळालेल्या माहितीच्या आधारे कुणाल परदेशी याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबूली दिली. त्याच्यासह सात साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक उंदरे करीत आहेत.

Web Title: Examination Kidnapped Doctor Facilitator Arrested

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..