एकाच दिवशी परीक्षेमुळे उमेदवार धास्तावले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

मुंबई महापालिका आणि जलसंपदा विभागाची कनिष्ठ अभियंता पदाची परीक्षा २५ नोव्हेंबर या एकाच दिवशी आल्याने हजारो अभियंत्यांचा जीव टांगणीला लागला आहे. जलसंपदा आणि महापालिकेला काही उमेदवारांनी ई-मेल पाठवून तारीख बदलण्याची मागणी केली आहे. मात्र त्यांना अद्याप काहीच उत्तर मिळालेले नाही. 

पुणे - मुंबई महापालिका आणि जलसंपदा विभागाची कनिष्ठ अभियंता पदाची परीक्षा २५ नोव्हेंबर या एकाच दिवशी आल्याने हजारो अभियंत्यांचा जीव टांगणीला लागला आहे. जलसंपदा आणि महापालिकेला काही उमेदवारांनी ई-मेल पाठवून तारीख बदलण्याची मागणी केली आहे. मात्र त्यांना अद्याप काहीच उत्तर मिळालेले नाही. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

मुंबई महापालिकेने स्थापत्य आणि यांत्रिकी व विद्युत विभागासाठी अनुक्रमे २४३ आणि ९८ कनिष्ठ अभियंत्यांच्या रिक्त पदांसाठी ऑनलाइन भरती सुरू केली आहे. त्यासाठी १२ ते २९ ऑक्‍टोबर या कालावधीत अर्ज भरण्यात आले. ऑनलाइन परीक्षा २५ नोव्हेंबर रोजी होणार असल्याचे १२ ऑक्‍टोबर रोजीच महापालिकेने स्पष्ट केले होते. तर जलसंपदा विभागाने स्थापत्य विभागातील कनिष्ठ अभियंत्यांच्या ५०० पदांसाठी जुलै-ऑगस्ट महिन्यात ऑनलाइन परीक्षा अर्ज भरून घेतले होते. पण परीक्षेची तारीख जाहीर केलेली नव्हती. त्यानंतर ऑनलाइन परीक्षेसाठी २५ व २६ नोव्हेंबर ही तारीख निश्‍चित केल्याचे १३ नोव्हेंबर रोजी जाहीर केले. उमेदवारांना  मिळालेल्या हॉलतिकिटावरही ती तारीख दिली आहे. 

मुंबई महापालिका आणि जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता पदांसाठी केवळ स्थापत्य अभियांत्रिकी विषयात तीन वर्षांचा डप्लोमा केलेले विद्यार्थीच पात्र आहेत. अनेक वर्षानंतर या विद्यार्थ्यांसाठी ही ‘मेगाभरती’ होत असल्याने शासकीय नोकरीची संधी निर्माण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून हजारो विद्यार्थ्यांनी या पदांसाठी अर्ज केले आहेत. 

मुंबई महापालिकेने २५ नोव्हेंबर तारीख जाहीर केल्याने जलसंपदा विभागातर्फे अन्य तारखेला परीक्षा घेणे अपेक्षित होते. परंतू या दोन्ही विभागांच्या तारखा एकच  आल्याने उमेदवारांचे मोठे 
नुकसान होणार आहे. एकमेकांमध्ये समन्वय साधून तारखांमध्ये बदल करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

स्थापत्य विषयात पदविका प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांसाठी या दोन्ही परीक्षा महत्त्वाच्या आहेत. पण त्या एकाच दिवशी आल्याने मोठे नुकसान होणार आहे. मुंबई महापालिकेच्या परीक्षेसाठी माझे केंद्र नागपूर तर जलसंपदाच्या परीक्षेसाठी पुणे केंद्र आहे. त्यामुळे दोन्हीपैकी एक परीक्षा मला देता येणार नाही. परीक्षेची तारीख बदलली तर याचा फायदा हजारो उमेदवारांना होईल. 
- परीक्षार्थी अभियंता


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Examination of the post of Junior Engineer of Mumbai Municipal and Water Resources Department on the same day