स्वयंस्फूर्ती हेच संगीत जीवनाचे इंधन - संजीव अभ्यंकर

नीला शर्मा
शनिवार, 5 ऑक्टोबर 2019

मेवाती घराण्यातील आघाडीचे गायक संजीव अभ्यंकर यांचा शनिवारी (ता. ५) पन्नासावा वाढदिवस. बालवयातच लक्ष वेधून घेणाऱ्या या कलावंताने सुमारे चाळीस वर्षे भारतीय शास्त्रीय संगीतात अविरत साधना करत आपला आगळावेगळा ठसा उमटवला आहे. या टप्प्यावर त्यांच्याशी  केलेली बातचीत... 

मेवाती घराण्यातील आघाडीचे गायक संजीव अभ्यंकर यांचा शनिवारी (ता. ५) पन्नासावा वाढदिवस. बालवयातच लक्ष वेधून घेणाऱ्या या कलावंताने सुमारे चाळीस वर्षे भारतीय शास्त्रीय संगीतात अविरत साधना करत आपला आगळावेगळा ठसा उमटवला आहे. या टप्प्यावर त्यांच्याशी  केलेली बातचीत... 

प्रश्‍न : भारतीय शास्त्रीय संगीताकडे आज अनेक तरुण वळताना दिसतात. त्यांना काय सांगाल? 
संजीव : शास्त्रीय संगीतात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुण मुलामुलींनी एक प्रसिद्ध वाक्‍य कायम स्मरणात ठेवावे ‘रोम वॉज नॉट बिल्ट इन अ डे’ (रोम हे बलाढ्य आणि ऐतिहासिक शहर एका दिवसात निर्माण झालेले नाही). याचा अर्थ, कोणत्याही शाश्‍वत व चिरकाल टिकून राहणाऱ्या निर्मितीसाठी वर्षानुवर्षींची मेहनत व जिद्द लागते. खूप संयम ठेवावा लागतो. विद्यार्जन करण्यासाठी व आवाज साधनेसाठी बराच काळ द्यावा लागतो. माझ्या आयुष्याची अठरा वर्षे ही विद्यार्जन करण्यात व आवाज साधनेत व्यतीत झाली. 

आतापर्यंत मिळविलेल्या ज्ञानावर समाधानी आहात का? 
ज्ञान हे अथांग असल्यामुळे विद्यार्जन कधीच संपत नाही. कलेमधील प्रगती ही सतत घडणारी क्रिया आहे. वयाच्या पन्नासाव्या वर्षीही मी जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा दरवर्षागणिक प्रतिभेच्या मार्गावरील माझ्या प्रगतीचा आढावा घेतो. काही पावले पुढे आल्याची जाणीव मग पुढच्या प्रवासाची ऊर्मी बनते. प्रतिभेचा व निर्मितीचा हा प्रवास कधीही न संपणारा आणि म्हणूनच कठीण आहे. ‘स्वयंस्फूर्ती’ हे या प्रवासातले सर्वांत प्रमुख इंधन आहे. 

व्यावसायिक यश मिळविण्यासाठी तरुण कलावंतांनी काय करावे? 
निर्मितीक्षम विद्यार्थ्याने फक्त सध्या काय विकले जात आहे, याचाच विचार न करता आपली स्वनिर्मिती कशी सर्वोत्तमपणे लोकांपुढे येईल, याचा विचार करावा. असा विचार केल्याने तुम्ही या क्षेत्रात काही भर घालू शकाल. नाहीतर फक्त ‘गायनावर उपजीविका’ हीच तुमच्या जीवनात यशाची अत्यंत मर्यादित व्याख्या ठरेल. पन्नाशीच्या माझ्या या टप्प्यावर, संगीत क्षेत्रात येणाऱ्या तरुण कलावंतांना माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा! 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: exclusive story Talks with singer Sanjeev Abhyankar