esakal | अतिव्यायाम बेततोय तरुणांच्या जिवावर!
sakal

बोलून बातमी शोधा

fitness

अतिव्यायाम बेततोय तरुणांच्या जिवावर!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : आधी अशी परिस्थिती होती, की व्यायाम करा असे सांगावे लागायचे. कोरोनानंतर आता ‘फिटनेस’बद्दल तरुणांमध्ये अचानक जोश वाढल्याचे दिसते. त्यातून काही तरुण अतिव्यायाम करू लागले. पण, ते आता त्यांच्या जिवावर बेतत असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.

पुण्यात गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये अतिव्यायाम करणाऱ्या तरुणांचा अचानक हृदयाची क्रिया बंद पडून मृत्यू झाला. या पार्श्‍वभूमिवर वैद्यकीय तज्ज्ञांनी ही निरीक्षणे नोंदविली आहेत. आपल्या जवळचे मित्र दहा-वीस किलोमीटर सलग पळतात. ४२ किलोमीटरची मॅरेथॉन वेळेत पूर्ण करतात. आता आपलाही ‘फिटनेस’ वाढला पाहिजे. त्यामुळे कोरोनापासून आपणही दूर राहू शकतो. अशा भ्रामक कल्पना डोक्यात घेऊन तीस-पस्तीस वर्षे अजिबात व्यायाम न करणारे तरुण अचानक ‘फिटनेस’बद्दल जागृत होतात. कमी वेळेत जास्त व्यायाम करतात. त्यातून थेट जिवाला धोका निर्माण होतो.

हृदयरोगतज्ज्ञ डॉ. ऋतुपर्ण शिंदे यांनी सांगितले, की व्यायामाला सुरुवात करण्यापूर्वी ‘फिटनेस असेसमेंट’ करून घ्या. इकोकार्डिओग्राम (ईसीजी), ‘२-डी-इको’ अशा मूलभूत चाचण्या करून वैद्यकीय सल्ला घ्या. व्यायामामुळे होणारे उपाय आणि अपाय यामध्ये अत्यंत पुसटशी रेघ असते. अतिउत्साहामध्ये आणि ‘पीअर प्रेशर’मुळे बऱ्याचदा आपण उपायाकडून अपायाकडे वाटचाल करतो. यासाठी व्यायाम हा नियंत्रित आणि सुरक्षितरित्या करणे अत्यावश्यक आहे. कमाल हृदयगती, ‘बोर्ग स्केल’ आणि संभाषण चाचणी याचा उपयोग केल्यास सुरक्षितरित्या व्यायाम करता येईल.

लहान वयाच्या तरुण खेळाडूंमध्ये होणाऱ्या ‘सडन कार्डियाक डेथ’चा मरणोत्तर अभ्यास केला. अशा खेळाडूंमध्ये हृदयस्पंदनाचा ताल आणि लय बिघडते, हृदयाचा वेग वाढतो, ठोके अतिजलद पडतात असे दिसून आले आहे. (व्हेन्ट्रीक्युलर अरिद्‍‍मिया) हा प्रकार आनुवंशिक आणि गुणसूत्रीय दोषांमुळे होत असून, पळण्याच्या स्ट्रेस आणि त्यामुळे स्त्रवणारे स्ट्रेस हार्मोन ॲड्रिनॅलिन यामुळे तो सुरू होतो. त्या क्षणाला उपचार मिळाले नाही, तर मृत्यू ओढवतो, असे वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. लिली जोशी यांनी सांगितले.

काय केले पाहिजे?

व्यायाम करताना हृदयविकाराचा धक्का आलेल्या रुग्णाला तातडीने उपचार सुरू करण्यासाठी प्रत्येक जिममध्ये ‘डेफिब्रिलेटर’ असावा. तसेच, तेथील कर्मचाऱ्यांना रुग्णाच्या छातीवर दाब देऊन हृदयाचे कार्य पुन्हा सुरू करण्यासाठी ‘सीपीआर’चे प्रशिक्षण झाले असणे आवश्यक आहे.

हे करा बारकाईने निरीक्षण

हृदयाची गती : व्यायाम करताना आपल्या हृदयाची गती किती आहे हे बारकाईने बघा. ही गती मोजण्यासाठी विविध तंत्रज्ञान आता उपलब्ध आहे.

रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण : ऑक्सिमिटर आता प्रत्येक घरांत असतो. त्यातून रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण बघा.

चाळीशीच्या नंतर व्यायाम सुरू करायचा असेल, तर आपली ‘एक्सरसाईज टेस्ट’, किमान ‘ईसीजी’ करा.

याकडे लक्ष द्या

  • ‘स्टार्ट स्लो अँण्ड गो स्लो’ या सूत्राचा अवलंब करा. व्यायामाला हळू सुरुवात करून तो संथ गतीने केला पाहिजे. संबंधित व्यायाम प्रकार आपल्या शरीराला कसा मानवतोय, हे बघत तो पुढे करायला पाहिजे.

  • आपण व्यायाम तंदुस्तीसाठी करतोय, की क्रीडा स्पर्धेच्या तयारीसाठी हे बघा.

  • हृदयाची तंदुरुस्ती आवर्जून तपासा. त्यासाठी ‘२-डी इको’ आणि ‘स्ट्रेस टेस्ट’ करा.

  • हृदयाचा आनुवंशिक आजार आहे का, हे तपासा.

  • हृदयाचे ठोक्यातील नियमित आहेत का, याची चाचणी करा.

loading image
go to top