लय भारी, कऱ्हेकाठी रंगलीये थ्रीडी रांगोळीतून "आठवणीतील वारी'

saswad
saswad

सासवड (पुणे) : कोरोनामुळे यंदा पंढरीची वारी घडली नाही. पालखी सोहळ्यात जाता आले नाही. त्यामुळे पालखीतील वैष्णवांचा मेळा, दिंड्या, पताका, वारीतील सांप्रदायिक खेळ वा क्षण टिपत चक्क कऱ्हेकाठी संत सोपानदेवांचे समाधीस्थळ असलेल्या सासवड शहरात "आठवणीतील वारी' थ्रीडी रांगोळी पद्धतीने सासवडचे रंगावलीकार सोमनाथ भोंगळे व सात सहकाऱ्यांनी सादर केली आहे. त्याला समक्ष व सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

सासवड (ता. पुरंदर) येथे श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या स्व. कमलाबाई माणिकचंद मुथा कन्या प्रशालेत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त जुन्या वारीतील क्षण रांगोळीत रंगभरण पद्धतीने आणि तेही थ्रीडीमध्ये (त्रिमिती) साकारले आहेत. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त थ्रीडी रांगोळी कलाकार सोमनाथ अनंतराव भोंगळे यांनी ही आठवणीतील वारी अक्षरशः हुबेहूब साकारली आहे. त्यांचे सहकलाकार मयूर दुधाळ, अविष्कार भोंगळे, अभिषेक शिंदे, पायल गिरमे, मयुरी गिरमे, रिया भोंगळे यांनी साथ दिली आहे. 

या प्रदर्शनाचे उद्‌घाटन आमदार संजय जगताप यांनी केले. सनदी अधिकारी राजेंद्र जगताप, प्राचार्य अरुण सुळगेकर, इस्माईल सय्यद उपस्थित होते. बुधवारी (ता. 24) प्रदर्शनाला सुरुवात झाली. ते जूनअखेरपर्यंत चालेल. लॉकडाउनमुळे ऑनलाइनही प्रदर्शन पाहता येईल, अशी व्यवस्था केली आहे; असे सासवड पालिकेच्या नगरसेविका सीमा सोमनाथ भोंगळे यांनी सांगितले. 

कोविड-19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन असल्याने यावर्षी पंढरपूर पायी वारी रद्द झाली. त्यामुळे लाखो वारकरी, भक्तगण निराश झाले. या भक्तगणांच्या आठवणी जाग्या करून वारीचा आनंद त्यांना देता यावा म्हणून ऑनलाइन, व्हाटसऍप, यू ट्यूबच्या माध्यमातून रांगोळी प्रदर्शनाचे नियोजन करण्यात आले. त्यामुळे घरबसल्या वारीचा आनंद लोकांना घेता येणार आहे. 
- सोमनाथ भोंगळे, कलाकार 

रांगोळी प्रदर्शनाबाबत 
- हेलिकॉप्टरने माउलींच्या पादुका घेऊन जातानाची रांगोळी सर्वांचे आकर्षण ठरली आहे 
- बालकलाकार आविष्कार सोमनाथ भोंगळे याची रांगोळीसुद्धा लक्ष वेधून घेते 
- दहा दिवस मेहनत करून या वारीचे रंग उलगडणाऱ्या रांगोळ्या साकारल्या 
- लहान मुलांपासून स्त्री, पुरुष, वृद्ध वारकऱ्यांचे विविध भाव टिपलेत 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com