ग्रामीण भागात मसापचा विस्तार :10 नव्या शाखा सुरू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 एप्रिल 2019

पुणे : ग्रामीण भागांमध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेचा विस्तार वाढत आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील साहित्य संमेलनाच्या आयोजनापासून ते विविध उपक्रम येत्या वर्षभरात राबवण्यात आले. तसेच सिन्नर, चोपडा, मंगळवेढा, पारनेर, भडगाव, चाकण, पुसेगाव, चाफळ, नाशिक, कर्जत या 10 ठिकाणी नवीन शाखा सुरू झाल्या आहेत. मसापच्या जाहीर झालेल्या कार्यअहवालात ही माहिती प्रसिद्ध झाली. 

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारी मंडळाने 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2019 या कालावधीतील विशेष उपक्रमांबाबतचा कार्यअहवाल जाहीर केला आहे. या अहवालामध्ये मसापने वर्षभर केलेल्या उपक्रमांबाबती माहिती प्रसिद्ध केली आहे. साहित्य चळवळ ग्रामीण भागात पोहोचण्यासाठी शिवार साहित्य संमेलन तसेच अनेक वाङ्मयीन उपक्रम ग्रामीण भागात घेण्यात आले. मसापचे गुहागर येथील विभागीय साहित्य संमेलन, पंढरपूर येथील समीक्षा संमेलन, मंगळवेढा येथील शाखा मेळावा, अंमळनेर येथील युवा साहित्य-नाट्य संमेलन संपन्न झाले होते.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात 80% नव्या लेखक कवींना स्थान, ग्रामीण भागाला प्राधान्य मिळण्यासाठी मसापकडून भर देण्यात आला. याबरोबरच पु. ल. आणि गदिमा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पुण्यात आणि शाखांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर साहित्य जागर करण्यात आला. तसेच कादंबरीकार ह. ना. आपटे आणि राम गणेश गडकरी यांच्या स्मृतिशताब्दीनिमित्त आणि ना. सी. फडके आणि कवी गिरीश यांच्या 125 व्या जयंतीवर्षानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले. कथा, कविता, कादंबरी, ब्लॉगलेखन, कॉपीराईट आणि लेखक, सोशल मीडिया अशा विविध कार्यशाळांचे यावर्षी आयोजन करण्यात आले होते. असे अनके उपक्रम कार्यअहवालात प्रसिद्ध करण्यात आले. 

Web Title: Expansion of masap in rural areas by starting 10 new branches