कुरकुंभला केमिकल टाकीचा स्फोट 

सावता नवले
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथील औद्योगिक वसाहतीतील इटर्निस फाइन केमिकल लिमिटेड कंपनीतील फायबर टाकीचा रविवारी (ता. 20) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास उत्पादन प्रक्रिया चालू असताना स्फोट झाला. त्यावेळी मोठा हादरा बसला. त्यामुळे खिडक्‍यांच्या काचा फुटल्या; तर छतावरील पत्र्याचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. 
 

कुरकुंभ (पुणे)  : येथील औद्योगिक वसाहतीतील इटर्निस फाइन केमिकल लिमिटेड कंपनीतील फायबर टाकीचा रविवारी (ता. 20) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास उत्पादन प्रक्रिया चालू असताना स्फोट झाला. त्यावेळी मोठा हादरा बसला. त्यामुळे खिडक्‍यांच्या काचा फुटल्या; तर छतावरील पत्र्याचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. 

कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील इटर्निस फाइन केमिकल कंपनीत फिनाईल इथाईल ऍसिटेट बनविण्याच्या प्रक्रियेदरम्यान रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास तिसऱ्या मजल्यावरील हायड्रोक्‍लोराईड ऍसिडच्या फायबर टाकीचा स्फोट झाला. स्फोट झालेल्या फायबर टाकीची क्षमता 3 हजार 500 लिटर एवढी होती. मात्र, त्यामध्ये फक्त 220 लिटर हायड्रोक्‍लोराईड ऍसिडचा साठा होता. त्यामुळे मोठा धोका टळला. या स्फोटामुळे परिसरात लांब अंतरापर्यंत मोठा हादरा जाणवला. तसेच, कंपनीच्या खिडक्‍या व इतर काचेच्या वस्तू फुटल्या. त्यांचा खच पडला होता. तसेच, छतावरील पत्र्याचे नुकसान झाले. 

स्फोट झालेल्या हायड्रोक्‍लोराईट ऍसिडच्या टाकीला सुरक्षाकठडे असल्याने ऍसिड सुदैवाने बाहेर पसरले नाही. कंपनीतील उत्पादन प्रक्रिया यांत्रिक पद्धतीने चालत असल्याने मनुष्यबळ कमी लागते. प्रक्रिया चालू असताना कंपनीमध्ये तीन कामगार उपस्थित होते. सुदैवाने या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती कंपनीचे अधिकारी विजय खाडे, बसवराज बकील, नामदेव हरिहर यांनी दिली


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Explosion at a chemical company at Kurkumbh