पक्षाविरुद्ध काम केल्यास हकालपट्टी - अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 जानेवारी 2017

कामशेत - गटातटाच्या राजकारणामुळे मावळात पक्षाची सत्ता नाही. निवडणुकीत अधिकृत उमेदवाराच्या विरोधात पक्षाच्या कोणत्याही नेत्याने काम करायला सांगितले, तर थेट मला फोन करा, त्याच क्षणी त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येईल, असा इशारा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रचाराचा प्रारंभ अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी कामशेत येथे झाला. त्या वेळी आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. माजी मंत्री मदन बाफना, जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, कृष्णराव भेगडे, माउली दाभाडे, बाळासाहेब नेवाळे, तालुकाध्यक्ष गणेश ढोरे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, निरीक्षक राजेंद्र खांदवे, युवक अध्यक्ष रमेश गायकवाड, महिलाध्यक्षा शुभांगी राक्षे उपस्थित होत्या. 

पवार म्हणाले, ‘‘अच्छे दिनाची फसवी घोषणा करून भाजपने सत्ता मिळवली असली, तरी ती फोल ठरली आहे. नोटाबंदीचा फटका सर्वसामान्य घटकांना बसला आहे. पंतप्रधान स्वत:ला फकीर समजतात अन्‌ दिवसातून चार वेळा ड्रेस बदलतात. लोकांच्या भावनेला हात घालून फसविण्याचे काम भाजप सरकार करीत आहे.’’

...तर मावळला अध्यक्षपद
आगामी निवडणुकीत पक्षाला विजय प्राप्त झाला, तर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मावळ तालुक्‍याला देण्याची घोषणा अजित पवार यांनी कामशेत येथील मेळाव्यात केली. पवना जलवाहिनी आंदोलनाशी काहीही संबंध नसताना माझ्यावर आरोप केले गेले. त्या प्रकरणाशी माझा नखाइतकाही संबंध असला, तर मी राजकारणातून संन्यास घेईन, अशी घोषणाही पवार यांनी केली. 

Web Title: expulsion if the party oppose work