गर्भवतींची ससूनऐवजी अन्य रुग्णालयांत सोय 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 27 April 2020

 खासगी रुग्णालयांत दाखल होणाऱ्या गर्भवतींचा खर्च महापालिका करणार असून, त्याबाबतच्या धोरणाची पुढच्या चार दिवसांत अंमलबजावणी होण्याची शक्‍यता आहे.

पुणे - कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने गर्भवतींच्या तपासण्यांसह प्रसूती सुरक्षित आणि वेळेत व्हावी, यासाठी महापालिकेने पावले उचलली आहेत. प्रसूतीसाठी ससूनमध्ये दाखल होणाऱ्या गभर्वतींना महापालिका किंवा खासगी रुग्णालयांत उपचार देण्याची व्यवस्था केली जात आहे. खासगी रुग्णालयांत दाखल होणाऱ्या गर्भवतींचा खर्च महापालिका करणार असून, त्याबाबतच्या धोरणाची पुढच्या चार दिवसांत अंमलबजावणी होण्याची शक्‍यता आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाची लागण झालेल्या २०५ जणांवर ससूनमध्ये उपचार सुरू आहेत. ही संख्या वाढण्याची शक्‍यता आहे. मात्र, अन्य आजाराचे रुग्ण आणि कोरोना संशयित ही मोठ्या प्रमाणात ससूनमध्ये येत आहेत. प्रसूतीसाठी दाखल होत असलेल्या महिलांमध्ये प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांची संख्या अधिक आहे. परंतु, कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करताना या गर्भवतींकडे दुर्लक्ष होण्याची भीती आहे. तसेच, गर्भवतींच्या तपासण्या, प्रसूतीमुळे अन्य कामांवर परिणाम होऊन त्याचा यंत्रणेवर ताण असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ससूनमधील काही रुग्ण इतरत्र हलविण्याबाबत पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत चर्चा झाली. त्यानंतर पहिल्या टप्प्यांत ससूनमध्ये दाखल असलेल्या आणि या पुढे येणाऱ्या सर्व गर्भवतींना महापालिकेच्या रुग्णालयांत दाखल करण्याचे नियोजन महापालिका करीत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महापालिकेची १७ प्रसूतीगृह असून, याठिकाणी मोफत प्रसूती करण्यात येते. त्यामुळे गरीब कुटुंबातील २० ते २१ हजार महिलांची वर्षाकाठी नोंद होते. मात्र आजघडीला या प्रसूतीगृहांतील यंत्रणा पुरेशी नसल्याने काही गर्भवतींना आयत्यावेळी खासगी रुग्णालयांत जावे लागत आहे. या पार्श्‍वभूमीवर ससूनमधील गर्भवतींना खासगी रुग्णालयांत दाखल करण्याची योजना तयार केली जाण्याची शक्‍यता आहे. तसे झाल्यास गर्भवतींच्या उपचाराच्या खर्चाचे धोरण ठरविण्याबाबत सोमवारी (ता.२७) निर्णय घेतला जाणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले. 

कोरोना रुग्णांवर प्राधान्याने उपचार केले जात आहेत. या काळात गर्भवतींना वेळेत आणि अपेक्षित सुविधा पुरविण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. या महिलांना गरजेनुसार महापालिका आणि खासगी रुग्णालयांत दाखल करून उपचाराची व्यवस्था केली जाईल. दुसरीकडे, ससूनमधील कोरोना रुग्णांनाही वेळेत उपचार मिळतील. 
- शेखर गायकवाड, महापालिका आयुक्त 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Facilities for pregnant women in private hospitals