फडणवीस सरकार मोदींपेक्षा चांगले - हजारे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जून 2019

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारपेक्षा महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकार चांगले काम करीत आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी फडणवीस सरकारचे कौतुक केले.

पुणे - केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारपेक्षा महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकार चांगले काम करीत आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी फडणवीस सरकारचे कौतुक केले. दरम्यान, येत्या पावसाळी अधिवेशनात प्रभावी लोकायुक्त कायदा निर्माण करण्यासंदर्भात विधेयक मंजूर होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

राज्यात प्रभावी लोकायुक्त कायद्याचा मसुदा तयार करण्याबाबत ‘लोकायुक्त अधिनियम १९७१ दुरुस्तीसाठी संयुक्त मसुदा समिती’ आणि सरकारच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक यशदा येथे सुरू आहे. ही बैठक दोन दिवस चालणार आहे. अण्णा हजारे यांच्यासह समितीचे सदस्य माजी सनदी अधिकारी उमेशचंद्र सरंगी, विश्वंभर चौधरी, शाम असावा, संजय पठाडे आणि सरकारचे प्रतिनिधी म्हणून अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) संजय कुमार, विधी व न्याय विभागाचे सचिव राजेंद्र भागवत बैठकीला उपस्थित आहेत.

अण्णा हजारे म्हणाले, ‘‘केंद्रात लोकपाल कायदा अस्तित्वात आला आहे. त्यानंतर वर्षभरात सर्व राज्यांमध्ये लोकायुक्त कायदा होणे अपेक्षित होते.  परंतु, ते अद्याप झालेले नाही. राज्याचा माहिती अधिकार कायदा देशाला मार्गदर्शक ठरला. त्यानुसार लोकायुक्‍त कायदाही मार्गदर्शक आणि प्रभावी व्हावा, यासाठी मसुदा तयार करण्याबाबत चर्चा सुरू आहे. याबाबतचे विधेयक येत्या पावसाळी अधिवेशनात मांडण्यात येईल. हे विधेयक संमत होऊन त्याची अंमलबजावणी होईल, अशी अपेक्षा आहे.’’

सध्याचा कायदा प्रभावी नाही 
सध्याच्या लोकायुक्तांनी गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांच्यावर ठपका ठेवला आहे. परंतु, त्यांचा राजीनामा घेतला जात नाही. त्यावर हजारे म्हणाले, ‘‘राज्यात सध्याचा लोकायुक्त कायदा प्रभावी नाही. प्रभावी लोकायुक्त कायदा लागू झाल्यानंतर भ्रष्टाचारी मंत्री किंवा मुख्यमंत्र्यांवरही या कायद्यानुसार कठोर कारवाई होईल.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Fadnavis government is better than Modi says anna hazare