काळा पैसा बाहेर काढण्यात अपयश - शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जानेवारी 2017

बारामती - नोटाबंदीनंतर उद्‌भवलेल्या स्थितीत सहकार चळवळ वाचली पाहिजे यासाठी आपण स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करणार आहे. काळ्या पैशाला बाहेर काढण्यासाठी मोदींनी नोटाबंदीचा निर्णय घेतला. पण त्यात त्यांना सपशेल अपयश आल्याची टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मंगळवारी येथे केली.

बारामती - नोटाबंदीनंतर उद्‌भवलेल्या स्थितीत सहकार चळवळ वाचली पाहिजे यासाठी आपण स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करणार आहे. काळ्या पैशाला बाहेर काढण्यासाठी मोदींनी नोटाबंदीचा निर्णय घेतला. पण त्यात त्यांना सपशेल अपयश आल्याची टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मंगळवारी येथे केली.

पवार म्हणाले, ‘‘गेल्या काही दिवसांत केंद्र सरकारकडून जे निर्णय होत आहेत ते निर्णय सहकारी चळवळीला घातक आहेत. ग्रामीण भागातील मोठे अर्थकारण सहकाराशी निगडित आहे. या निर्णयांचा ग्रामीण अर्थकारणावर विपरीत परिणाम होतो आहे आणि फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशात याचा त्रास लोकांना होतो आहे. त्यामुळे ही बाब मी त्यांच्या निदर्शनास आणून देणार आहे. मला अपेक्षा आहे की ते यातून काहीतरी चांगला मार्ग काढतील.’’

मनमोहनसिंग असताना पेट्रोलच्या बॅरलचा आंतरराष्ट्रीय बाजारात १४५ अमेरिकन डॉलर इतका दर होता, आता हाच दर ५० डॉलरपर्यंत खाली येऊनही दिवसेंदिवस पेट्रोल डिझेलच्या किमतीत वाढ कशी काय होते हे मलाही समजेनासे झाले आहे. काँग्रेसने मुंबईत युती होणार नाही हे आधीच जाहीर करून टाकले असले तरी आजच सुनील तटकरे यांना मी मुंबई वगळता राज्यात इतर ठिकाणी समविचारी पक्षांशी युती व्हावी, अशी सूचना केली आहे. आम्ही आमच्या बाजूने सामंजस्याची भूमिका घेत प्रामाणिकपणे युतीचा प्रयत्न करणार आहोत, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर राज्यातील चित्र कदाचित वेगळे असू शकते, असे सूतोवाच त्यांनी केले. आजही भाजपमध्ये एक मोठा वर्ग असा आहे ज्यांना स्वबळावर सत्ता हवी आहे. त्यामुळे या निवडणुकीचा परिणाम होऊ शकतो, अर्थात ही शक्‍यता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याबाबत ठोस काही वक्तव्य करता येऊ शकत नसल्याचेही त्यांनी सांगितले.

‘...म्हणून इतर पक्षांनाच नोटाबंदीच्या यातना’
नोटाबंदी होणार ही बाब फक्त भाजपलाच माहिती होती. इतर पक्षांना त्याची माहितीच नव्हती. निवडणुकीत भाजपला यश मिळाले कारण त्यांनी योग्य तयारी करून ठेवली असावी. त्यामुळे भाजपला नाही तर इतर पक्षांनाच नोटाबंदीच्या यातना अधिक झाल्या, असे सूचक वक्तव्य शरद पवार यांनी केले.

Web Title: Failure to pull out the black money