
पुणे : भूसंपादनच्या बैठकीत शेतकऱ्यांचा वाद
पुणे : महापालिकेच्या विकास आराखड्यात बालेवाडी मधील लक्ष्मीमाता चौक ते ज्युपिटर हॉस्पिटलकडे जाण्यासाठी ३० मीटर रस्ता आखला आहे. पण सर्वे क्रमांक १० मधून हा रस्ता चुकीच्या पद्धतीने वळविण्यात आला आहे. यामध्ये शेतकऱ्यांची जास्त जमीन जात आहेच, पण वाहतुकीच्या दृष्टीनेही हा रस्ता धोकादायक ठरणार असल्याने त्यास शेतकऱ्यांनी विरोध केला आहे.
आज भूसंपादनासाठी झालेल्या बैठकीत यावरून प्रशासन आणि शेतकऱ्यांची वादावादी झाली.यासंदर्भात बालेवाडीतील शेतकऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रशासन ठराविक लोकांना डोळ्यासमोर ठेवून आमच्यावर अन्याय करत आहे असा आरोप केला.आनंद कांबळे, शशिकांत कांबळे, संदीप कांबळे, राजेंद्र कांबळे यांनी हा आरोप केला.
आनंद कांबळे म्हणाले, ‘१९९७ च्या आराखड्यात बालेवाडीकडे येणारा हा मुख्य रस्ता लक्ष्मीमाता चौका पर्यंत सरळ आहे. पण २०१७ च्या विकास आराखड्यात आराखड्यात तो एल आकारात वळविण्यात आला आहे. सर्वे क्रमांक १० मध्ये तो पुन्हा वळविण्यात आला असल्याने शेतातून जात आहे. हा रस्ता करण्यास आमचा विरोध नाही, पण वाहतूक कोंडी फोडण्याच्या नावाखाली काही लोकांच्या जमीनी वाचविण्यासाठी आमच्या जमिनीत रस्ता घुसवले आहेत.
हा रस्ता रस्ता रद्द करून १९९७ प्रमाणे प्रादेशिक आराखड्यानुसार सरळ करावा अशी आमची मागणी आहे. पण आयुक्तांनी आमचे म्हणणे फेटाळून लावत जागा द्या नाही तर तुमच्या जागांवर आम्ही कचरा, उद्यान, क्रीडांगणाचे आरक्षणे टाकू अशी धमकी दिली असल्याचा आरोप कांबळे यांनी केला.२०१७ ला विकास आराखडा करतानाही आम्ही हरकत नोंदविली होती पण त्याची दखल घेतली नाही असे संदीप कांबळे यांनी सांगितले.
यासंदर्भात महापालिका आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, ‘‘विकास आराखड्यात आखणी केल्याप्रमाणे रस्ता करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी सुनावणीसाठी बोलविण्यात आले होते. रस्ता ताब्यात घेण्यासाठी धमकी देण्यात आलेली नाही.
Web Title: Farmer Dispute Land Acquisition Meeting Protest Road Dangerous Terms Of
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..