शेतकरी कुटुंबातील मुलगी झाली फौजदार (व्हिडिओ)

युनूस तांबोळी
रविवार, 24 जून 2018

टाकळी हाजी (पुणे): येथील एका गरीब शेतकरी कुटुंबातील संगीता पोकळे या मुलीने परिस्थितीवर मात करत स्पर्धा परीक्षेतून फौजदारपद मिळविले.

टाकळी हाजी (पुणे): येथील एका गरीब शेतकरी कुटुंबातील संगीता पोकळे या मुलीने परिस्थितीवर मात करत स्पर्धा परीक्षेतून फौजदारपद मिळविले.

आर्थिक परिस्थिती जेमतेम. आई निरक्षर. वडील चौथी पास. वडील शाळेत शिपाई म्हणून काम करत असल्याने प्रपंच कसाबसा चालायचा. मुलगी म्हटलं, की शिक्षणासाठी घरातूनच नकार असतो. पण त्यातूनही पुण्यासारख्या ठिकाणी राहून कृषी पदविका घेतली. तिचे वडील टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील बापूसाहेब गावडे विद्यालयात शिपाई म्हणून कार्यरत होते. एक भाऊ व एक बहीण या परिवाराची जबाबदारी त्यांच्यावर होती. जेमतेम आर्थिक परिस्थिती असलेल्या या शेतकरी कुटुंबांत संगीता हिचा जन्म झाला. लहानपणापासून शिक्षणाची आवड असल्याने अभ्यासातील जिद्दीपणा परिस्थितीपुढे तिने सोडला नाही. प्रापंचिक समस्या सोडविण्यातच शेतीतील उत्पन्न पुरत नसे. त्यामुळे आई-वडिलांना शेतीत काम करून मदत करण्याचे काम तिने केले.

कष्ट करण्याची सवय त्यामुळेच तिला लागली. त्यात 2007- 2008 मध्ये तिने बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. आई-वडिलांची इच्छा म्हणून तिने पुणे येथे कृषी पदविका पर्यंतचे शिक्षण 2012-2013 मध्ये पूर्ण केले. घरच्या गरिबी परिस्थितीची जाणीव ठेवून तिने कष्टाने अभ्यास केला. आई शेतात काबाडकष्ट करून मुलगी शिकावी यासाठी प्रयत्न करत होती. वडील निवृत्त झाल्यावर त्यांनी शेतीत काम करण्याचे ठरविले. आई-वडिलांनी केलेल्या कष्टातून तिच्या शिक्षणाला आधार मिळाला. कृषी पदविका घेतल्यावर तिने 2017 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. त्यातून ती उत्तीर्ण झाली असून, तिची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे.

Web Title: farmer familys sangita pokale pass out psi examination