शेतीविरोधी धोरणांमुळे आत्महत्या - अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

वरवंड - ‘‘आम्ही शरद पवार यांच्या माध्यमातून जनतेची कामे केली. शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. सध्याच्या सरकारला शेतकऱ्यांचे काही देणेघेणे नाही. शेतीविरोधी धोरणांमुळे शेतीमालाला बाजारभाव नाही. अनेक भागात शेतकरी आत्महत्या करीत आहेत,’’ अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

वरवंड - ‘‘आम्ही शरद पवार यांच्या माध्यमातून जनतेची कामे केली. शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. सध्याच्या सरकारला शेतकऱ्यांचे काही देणेघेणे नाही. शेतीविरोधी धोरणांमुळे शेतीमालाला बाजारभाव नाही. अनेक भागात शेतकरी आत्महत्या करीत आहेत,’’ अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

वरवंड (ता. दौंड) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनाची जाहीर सभा झाली. त्या वेळी अजित पवार बोलत होते. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, खासदार सुप्रिया सुळे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री जयंत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, आमदार दत्तात्रेय भरणे, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात, उपाध्यक्षा अर्चना घारे, जिल्हा परिषद अध्यक्ष विश्‍वास देवकाते, जालिंदर कामठे, वैशाली नागवडे, अप्पासाहेब पवार, योगिनी दिवेकर, रामदास दिवेकर आदी उपस्थित होते.

अजित पवार यांनी राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार आगपाखड केली. ते म्हणाले, ‘‘नोटाबंदीमुळे व्यापारी मेटाकुटीला आले आहेत. वर्षात दोन कोटी तरुणांना रोजगार देतो, असे आश्वासन दिले होते. उलट सरकारने नोकर भरती बंद केली आहे. राज्यात व देशातल्या अनेक कंपन्या बंद पडल्या आहेत. जिल्हा बॅंकेच्या भरतीवर ऐनवेळी ‘स्टे’ देण्यात आला आहे. बॅंकेत अनेक पदे रिक्त असल्याने कशी कामे करायची, असा प्रश्‍न पडला आहे. ज्या महादेव जानकर यांनी जनतेचे एकही काम केले नाही, त्यांना दौंड तालुक्‍यात भरभरून मते मिळतात. आपण काम करणाऱ्यांच्या पाठीशी राहिले पाहिजे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या उमेदवार सुप्रिया सुळेच असणार आहेत.’’

‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी अन्‌ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोललेली एकही गोष्ट केली नाही. उलट सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे जनता हैराण झाली आहे. आम्ही काम करणारी माणसे आहोत. तोंडाच्या नुसत्या वाफा घालवत नाही. आमच्या नादाला लागू नका,’’ असा इशारा अजित पवार यांनी दिला. 
वळसे पाटील म्हणाले, ‘‘राज्यात व जिल्ह्यात सुप्रिया सुळे या क्रमांक एकच्या खासदार आहेत.

आमच्या सरकारच्या काळात शरद पवार व अजित पवार यांनी राज्यात विकासाची गंगा आणली. या सरकारने खोटीनाटी आश्वासने दिली. ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविले; मात्र सर्वांची निराशा केली. देशात व राज्यात अत्याचार व गुन्हेगारी वाढली आहे. हे सरकार कुचकामी ठरले आहे.’’
या वेळी माजी आमदार रमेश थोरात, अप्पासाहेब पवार, योगिनी दिवेकर यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी काही जणांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

‘आगामी निवडणुकीत परिवर्तन होणार’
सुनील तटकरे म्हणाले, ‘‘खोटे बोल; पण रेटून बोल, अशी सरकारची भूमिका आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होत नाही, तोपर्यंत शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली हल्लाबोल आंदोलन सुरूच राहणार आहे. आगामी निवडणुकीत परिवर्तन होणार आहे. जातीवादी शक्तींपासून देशाला वाचवायचे असेल, तर शरद पवार यांच्याशिवाय पर्याय नाही.’’

मुख्यमंत्र्यांचा दौंड तालुक्‍यावर खूप जीव आहे; पण ते गाडीतून कधीच आले नाहीत. हवेतून (हेलिकॉप्टर) येतात अन्‌ हवेतूनच जातात. तालुक्‍यात येऊन त्यांनी कानगाव येथील शेतकरी आंदोलनाला भेटही दिली नाही. सरकारच्या धोरणामुळे समाजातील प्रत्येक घटक अडचणीत सापडला आहे. 
- सुप्रिया सुळे, खासदार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmer suicide by agriculture oppose policy ajit pawar