पाण्यासाठी शेतकरी उतरले कोरड्या तलावात

डाॅ. संदेश शहा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

इंदापूर शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेला तरंगवाडी तलाव गेल्या पाच वर्षांपासून कोरडा पडला आहे. या तलावावर चार गावच्या पाणी पुरवठा योजना अवलंबून आहेत. त्यामुळे ऐन पावसाळ्यात गावात टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. या तलावात खडकवासला धरणाच्या कालव्यातून पाणी येत होते. खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे या तलावात पाणी सोडावे यासाठी तरंगवाडी, गोखळी येथील शेतकऱ्यांनी बुधवारी तलावात बोंबाबोंब आंदोलन केले.

इंदापूर (पुणे) : इंदापूर शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेला तरंगवाडी तलाव गेल्या पाच वर्षांपासून कोरडा पडला आहे. या तलावावर चार गावच्या पाणी पुरवठा योजना अवलंबून आहेत. त्यामुळे ऐन पावसाळ्यात गावात टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. या तलावात खडकवासला धरणाच्या कालव्यातून पाणी येत होते. खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे या तलावात पाणी सोडावे यासाठी तरंगवाडी, गोखळी येथील शेतकऱ्यांनी बुधवारी तलावात बोंबाबोंब आंदोलन केले.

या तलावातून पूर्वी निम्म्या इंदापूर शहरास पाणी पुरवठा केला जात होता. मात्र, नगरपरिषदेने सुजल निर्मल योजनेंतर्गत उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील माळवाडी नंबर 1 येथून पाणी घेण्यास सुरवात केली. त्यामुळे तरंगवाडी तलाव कोरडा पडला. 70 हेक्‍टर क्षेत्रावर असलेल्या तलावावर गोखळी, तरंगवाडी, झगडेवाडी, गलांडवाडी नंबर 2, विठ्ठलवाडी, अवसरी गावांच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. तसेच चार मोठ्या प्रकल्पांचा उचल पाणी परवाना आहे. मात्र, तलावात पाणी नसल्याने त्यांना पर्यायी व्यवस्था पैसे खर्च करून करावी लागली आहे. बजरंग तरंगे या शेतकऱ्याने अर्धनग्न होऊन तसेच तलावातील मातीस प्रणाम करून पाणी सोडण्याची मागणी केली तर भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष माऊली वाघमोडे, बापू पारेकर, अजित तरंगे, हेमंत वाघमोडे, संकेत वाघमोडे, गणेश हांडे हे या आंदोलनात सहभागी झाले होते.

दुष्काळी परिस्थितीमुळे गेल्या 3 ते 4 वर्षांपासून टॅंकरचे पाणी प्यावे लागत आहे. पशुधनाचा पिण्याचे पाणी व चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नीरा व भीमा खोऱ्यात पूरजन्य स्थिती असताना या पाच गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गेल्या पाच वर्षांत शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे सर्व राजकीय नेत्यांनी तलावात पाणी सोडण्यासाठी पाठपुरावा करावा अन्यथा तरंगवाडी तलावाचा पाणी प्रश्न पेटल्याशिवाय राहणार नाही. जर तलावात पाणी आले नाही तर आम्हा सर्व शेतकऱ्यांना स्थलांतर करण्याशिवाय पर्याय नाही.
माऊली वाघमोडे, इंदापूर भाजप शहराध्यक्ष

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers Agitaion For Water In Indapur