नाना पाटेकरांचा चढला पारा; म्हणाले, 'ते शेतकरी आहेत, भिकारी नाही'

टीम ई-सकाळ
गुरुवार, 23 जानेवारी 2020

गरीब लोकांकडे भाव करू नका. दोन-चार रुपये जास्त गेले तर जाऊ द्या. जरा कुठे भाव वाढले की सगळ्यांचं वेळापत्रक बिघडतं, पण त्यांचं तर अख्ख्य आयुष्यचं बिघडलंय.

पिंपरी : ''महाराष्ट्राच्या दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील अनेक शेतकरी आजही आत्महत्या करत आहेत. आणि कर्जमाफी हा त्यावर एकमेव उपाय नाही. शेतकरी भिकारी नाहीत, त्यांना फक्त कर्जमाफीची नाही तर भावनिक आधाराची गरज आहे,'' असे मत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी बुधवारी (ता.22) व्यक्त केले.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कलारंग या संस्थेच्या 21 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात नाना बोलत होते. ते पुढे म्हणाले, 'जर राजकारणी पैसे देत नसतील, तर काही फरक पडणार नाही. शेतकऱ्यांना भावनिक आधार आणि दिलासा देण्याची सध्या गरज आहे. त्यांच्याशी दोन गोष्टी बोलण्याची गरज आहे.' 

नाम फाउंडेशनला मदत केल्याबद्दल त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचेदेखील आभार मानले. त्यानंतर पाटेकर म्हणाले, सर्व पक्षांमधील नेते माझे मित्र आहेत. मग शरद पवार, उद्धव ठाकरे किंवा देवेंद्र फडणवीस असोत. ते सगळे माझे मित्र आहेत. यावेळी त्यांनी स्मिता पाटील, एन. चंद्रा यांच्यासोबतच्या आठवणीही सांगितल्या. 

- झेंड्यावरुन वाद निर्माण करणाऱ्यांना मनसेची चपराक

शेतकऱ्यांबद्दल बोलताना ते म्हणाले, 'मध्यंतरी येरवडा जेलमध्ये गेलो असता तिथे मला 17 ते 25 वयोगटातील अनेकजण भेटले. त्यांनी केलेले गुन्हे हे रागाच्या एका क्षणामुळे घडले आणि आता त्याची शिक्षा भोगत आहेत. शेतकऱ्यांबद्दलही तसेच म्हणता येईल. आत्महत्या करण्याचा विचार येईल, तेव्हा तो क्षण थांबवून ठेवा. प्रत्येकाला आपण नाही पुरे पडू शकत. राजकारण्यांनी पैसे किंवा भरपाई नाही दिली तरी निदान खांद्यावर हात ठेवायला हवा. त्यांच्याशी दोन गोष्टी बोलायला हव्यात. नुसती कर्जमाफी करून काही उपयोग नाही,' अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. 

- गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी आदित्य-रोहित लागले कामाला

''आभाळातला बाप रागावला म्हणून आमची अवस्था अशी झाली. आणि तुम्ही राजकारणी लोकं गंमत करणार असाल तर मग काय? हल्ली प्रत्येक गोष्टीवर किंमतीची लेबलं आहेत, पण कांदा, टोमॅटो, बटाट्याला मात्र तुम्ही म्हणाला ती किंमत. साधी भाजी घेतानाही तुम्ही जी घासाघीस करता ती मॉलमध्ये गेल्यावर करता का?'' असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

- ..तर हिंदू म्हणून अंगावर जाईन - राज

'गरीब लोकांकडे भाव करू नका. दोन-चार रुपये जास्त गेले तर जाऊ द्या. जरा कुठे भाव वाढले की सगळ्यांचं वेळापत्रक बिघडतं, पण त्यांचं तर अख्ख्य आयुष्यचं बिघडलंय,' अशी खंतही नानांनी यावेळी व्यक्त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers are not beggars and they dont need just loan waivers says Nana Patekar