बारामती, दौंड व पुरंदरच्या शेतकऱ्यांना दिलासा 

जयराम सुपेकर
Saturday, 9 May 2020

सुमारे ५५२० लिटर प्रति सेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग होईल. 

सुपे (पुणे) : जनाई उपसा जलसिंचन योजनेद्वारे शेतीसाठी शनिवारपासून उन्हाळी आवर्तन सोडले आहे. बारामती, दौंड व पुरंदर तालुक्यातील योजनेच्या डाव्या व उजव्या कालव्यावरील गावांना या पाण्याचा फायदा होणार आहे. सुमारे ५५२० लिटर प्रति सेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग होईल. 

 चीनला टक्कर देणार बारामती, जेजुरी व कुरकुंभ...अशी आहे तयारी 

उन्हाळी हंगामातील पहिले आवर्तन मार्चच्या पहिल्या पंधरवड्यात सोडले होते. आता जनाईचे हे दुसरे आवर्तन सोडल्याची माहिती जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजना दौंडचे उपविभागीय अभियंता आर. डी. भुजबळ, शाखा अभियंता रोहन ढमाले यांनी दिली. ते म्हणाले की, बारामती तालुक्यातील पाच व दौंडमधील चार गावांनी पाणीपट्टीपोटी थकीत व आगाऊ रक्कमा भरल्या आहेत. काही गावांचे पैसे भरून घेण्याचे काम चालू आहे. राहिलेल्या गावांनी पाणीपट्टीची रक्कम तातडीने भरली, तर पाणी वितरणाचे नियोजन करणे सोपे होईल. पुरंदर तालुक्यातील गावांना योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातील साठवण तलावात आवश्यक पाणीसाठा झाल्यानंतर पाणी सोडले जाणार आहे. अंदाजे किमान वीस दिवस हे आवर्तन चालेल. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

टेल टू हेड या न्यायाने पाण्याचे वितरण होणार असून, जनाई योजनेच्या टप्पा क्रमांक एकवरील पंपगृहातील ७७५ अश्वशक्तीचे दोन पंप, तर टप्पा क्रमांक दोनवरील १०५२ अश्वशक्तीचे दोन पंप शनिवारी सकाळी अकरा व एकच्या दरम्यान चालू केले आहेत. हळूहळू रात्री उशिरापर्यंत पूर्ण क्षमतेने म्हणजे टप्पा एकचे पाच व दोनचे सहा पंप चालू करण्यात येतील. पूर्ण पंप चालू झाल्यानंतर ५५२० लिटर प्रति सेकंद वेगाने पाण्याचे वितरण होणार असल्याची माहिती या अधिकाऱ्यांनी दिली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers of Baramati, Daund and Purandar will get water for agriculture