esakal | ‘जनाई’चे पाणी खोरच्या शिवारात!
sakal

बोलून बातमी शोधा

जनाई उपसा सिंचन

‘जनाई’चे पाणी खोरच्या शिवारात!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

यवत : जनाई उपसा सिंचन योजनेचे पाणी खोरच्या शिवारात पोचल्याने येथील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. वाढाणे (ता. बारामती) गावच्या सीमेवर असलेल्या पंपांद्वारे हे पाणी सोडण्यात आले असून, ते सुमारे पाच किलोमीटरचा प्रवास करत सोमवारी (ता. ६) पिंपळाचीवाडी येथील बंधाऱ्यात पोचले.

हेही वाचा: कर्णबधिर जोडप्याची उद्योजकतेत ‘श्वेत’भरारी

पावसाने ओढ दिल्याने विहिरींनी तळ गाठला होता तसेच पिके कोमेजली होती. जनाई उपसा सिंचन योजनेचे पाणी मिळाल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. या आधी खोरच्या दक्षिणेकडील पद्मावती तलावात पाणी घेणे सुरू होते. मात्र त्यामुळे मर्यादित क्षेत्राला लाभ मिळत होता. आता फडतरे वस्ती तलावात पाणी सोडून त्याच्या सांडव्यावाटे गावाच्या मुख्य ओढ्यात पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे सुमारे पाच किलोमीटर अंतरावारील पिंपळाचीवाडी बंधाऱ्यापर्यंत पाणी पोचले आहे. या ओढ्याच्या भोवताली असलेल्या विहिरींना याचा फायदा होणार आहे. उपसा सिंचनाच्या पंप हाऊसमधून तीन पंपांद्वारे हे पाणी सोडले जात आहे. प्रत्येक पंपास सहाशे रुपये प्रतितास दर आकारण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी प्रत्येक विहीर मालकांकडून यासाठी पैसे गोळा करून सुमारे चार लाख दहा हजार रुपयांचा भरणा केला आहे. त्या बदल्यात चार पंपांद्वारे दोनशे तास पाणी सोडले जाणार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामभाऊ चौधरी यांनी दिली. या पाण्यामुळे हाताशी आलेली पिके संकटमुक्त होणार आहेत.

हेही वाचा: पुणे : आयुक्तांचा निषेध करून स्थायी समिती तहकूब

पुरंदर उपसा योजनेच्या पाण्याचीही मागणी

खोरची नैसर्गिक रचना पाहता गाव आवर्षणग्रस्त आहे. या गावाचा शिवार मोठा आहे. गावाभोवती पद्मावती, फडतरे वस्ती, डोंबेवाडी, इजूळा असे अनेक तलाव आहेत. ओढ्यांवर अनेक साखळी बंधारेही आहेत. मात्र पर्जन्यमान कमी असल्याने येथे पाण्याचे दुर्भिक्ष असते. जनाई उपसा सिंचन योजनेद्वारे पद्मावती व फडतरे वस्ती तलाव भरले गेले आहेत. तसेच पुरंदर उपसा सिंचन योजनेद्वारे डोंबेवाडी व इजूळा तलाव भरले जावेत, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

loading image
go to top