पावसाअभावी भातरोपे सुकली, मावळातील शेतकऱ्यांपुढे चिंतेचे वातावरण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

आठवडाभरापासून गायब झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांपुढे चिंतेचे वातावरण झाले असून रखरखत्या उन्हामुळे शिवारातील रोपे सुकू लागली आहेत तसेच भातलागवडही रखडली आहे.

टाकवे बुद्रुक : दोन आठवड्यापूर्वी पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी भातपेरणी केली त्यानंतर भातरोपेही तरारली आहेत. मात्र, आठवडाभरापासून गायब झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांपुढे चिंतेचे वातावरण झाले असून रखरखत्या उन्हामुळे शिवारातील रोपे सुकू लागली आहेत तसेच भातलागवडही रखडली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

निसर्गचक्रीवादळानंतर आंदर, नाणे व पवन मावळ भागात पडत राहिलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागतीस वेग धरला आणि भात पेरणी केली. मात्र मध्यंतरी बंद झालेल्या पावसामुळे पेरलेली बियाणे खराब होऊन काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ आली. दोन आठवड्यापुर्वी पावसाने पुन्हा सुरवात केल्याने सर्व शेतकऱ्यांनी पेरण्या केलेली रोपे चांगलीच तरारली आहेत. मात्र, सद्या लागवडीयोग्य झालेली रोपे आता पावसाअभावी व रखरखत्या उन्हामुळे सुकू लागली आहेत. याउलट, दीड महिनाभरापुर्वी सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी पेरणी केलेली रोपे आता तरारली असून शेतकऱ्यांनी लागवडीस सुरवात केलेली दिसून येत आहे.
-------------
खूशखबर ! भारतीय बनावटीची पहिली करोना लस तयार
-------------
आठवडाभरापूर्वी दडी मारलेल्या पावसामुळे गेल्यावर्षीप्रमाणे पाऊस उशीरा हजेरी लावतो की काय यामुळे शेतकऱ्यांनी शेतीच्या कामास ब्रेक मारला आहे. आंदर व नाणे मावळ भागात पाऊस पडेल या आशेने लागवड केलेली रोपे पावसाअभावी व रखरखत्या उन्हामुळे सुकू लागल्याने रोपे मरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच यावर्षी शिवरात गवताचे प्रमाण अधिक असल्याने शेतकर्यांसमोर अजून एक चिंतेचे वातावरण तयार झाले आहे.

सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांकडून भातलागवडिस सुरवात
आंदर, नाणे व पवन मावळ भागात सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी दीड महिन्यांपूर्वी भात पेरण्या केल्या आहे. रोपेही चांगली आली असून शेतकऱ्यांनी भातलावणीस सुरवात केली आहे. कमी प्रमाणातील शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय असल्याने या शेतकऱ्यांना इतर शेतकऱ्यांची मदत मिळत आहे तसेच मजुरांचाही तुडवडा भासत नसून भातलागवडीस वेग आला आहे. सध्या ट्रॅक्टरही उपलब्ध होत असल्यामुळे शेतकरी भातलावणीसाठी चिखल ट्रॅक्टर च्या साहाय्याने करून घेत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmers facing Problems in Maval taluka due to lack of rain