अमेरिकन अळीने खाल्ले शेतकऱ्यांचे "डोके' 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

अमेरिकन लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने हवालदिल झालेल्या मका उत्पादकांना चुन्याचा वापर करण्याचा सल्ला देणारे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर दोनच दिवसांत पुन्हा चुन्याच्या अतिवापराने मक्‍याचे नुकसान होत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, आता नेमके काय करायचे, हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला आहे. 

भवानीनगर (पुणे) - अमेरिकन लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने हवालदिल झालेल्या मका उत्पादकांना चुन्याचा वापर करण्याचा सल्ला देणारे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर दोनच दिवसांत पुन्हा चुन्याच्या अतिवापराने मक्‍याचे नुकसान होत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, आता नेमके काय करायचे, हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला असून, कृषितज्ज्ञांनी चुन्याचा वापर करू नये, असा सल्ला दिला आहे. 

अमेरिकन लष्करी अळी (स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा) ने सध्या राज्यात मक्‍याच्या पिकावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. पुणे जिल्ह्यातही अळीने मक्‍याचे पीक संकटात टाकले आहे. अवघ्या एकाच वर्षात सगळीकडे या अळीने विळखा घातल्याने कधी नव्हे ते मक्‍याचे दरही 2500 ते 2600 रुपये प्रतिक्विंटलवर पोचले आहेत. मात्र, दुसरीकडे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटण्याच्या शक्‍यतेने शेतकरी हवालदिल झाले आहेत. 

दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेतकऱ्याने व्हायरल केलेला एक मेसेज असा होता, की अळीच्या प्रादुर्भावाने ग्रस्त असलेल्या मक्‍याच्या पिकामध्ये 100 ग्रॅम चुना व 100 ग्रॅम वॉशिंग पावडर प्रति 20 लिटर पाण्यात मिसळून मक्‍याच्या पोंग्यात सोडल्यास पोंग्यातून अळी बाहेर येऊन मरते, असा तो व्हिडिओ होता. त्यानंतर दोनच दिवसांत या "औषधा'ने मक्‍याचे पीक कोमेजते, त्यामुळे हा प्रयोग करू नका, असा सल्ला मिळाल्याने शेतकरीही बुचकळ्यात पडले आहेत. चुन्याच्या वापराने अळी मरेल, परंतु पाने आकसतील व त्याचा उत्पादनावर विपरीत परिणाम होईल. त्याऐवजी 5 टक्के निंबोळी अर्क दोन मिली प्रतिएक लिटर पाण्याच्या प्रमाणात फवारावी. शेतात एकरी आठ कामगंध सापळे बसवावेत, पक्ष्यांना आकर्षित करण्यासाठी पक्षीथांबे तयार करून चुरमुरे किंवा सडके धान्य ठेवावे, जेणेकरून पक्षी आकर्षित होऊन अळ्या खातील. वरील कीटकनाशक फवारताना ते पिकाच्या पोंग्यात जाईल, याची मात्र काळजी घ्यावी. 
- डॉ. मिलिंद जोशी, कृषी विज्ञान केंद्र, बारामती 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers 'heads' eaten by the American military aloe (Spodoptera frugiparda)