दुष्काळसदृश तालुक्यात समावेश न झाल्याने जुन्नरमधील शेतकरी नाराज

दुष्काळसदृश तालुक्यात समावेश न झाल्याने जुन्नरमधील शेतकरी नाराज

जुन्नर : पुणे जिल्ह्यातील दहा तालुके दुष्काळसदृश जाहीर करण्यात आले. मात्र, यामध्ये जुन्नर तालुक्याचा समावेश नसल्याने शेतकरी वर्गातून तीव्र नाराजीची भावना व्यक्त करण्यात येत आहे.

दुष्काळी परिस्थितीच्या प्रभावदर्शक निर्देशांकांचे मूल्यांकन करून ट्रिगर दोनमधील जाहीर झालेल्या दुष्काळी तालुक्याच्या यादीत 180 तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. यात पुणे जिल्ह्यातील दहा तालुके आहेत. मात्र, उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर व खेडचा समावेश  नाही.

जुन्नरच्या आदिवासी भागात भात पिक काढण्याची लगबग सुरू आहे. अखेरच्या टप्प्यात भात पिकाकडे पावसाने पाठ फिरवली. यामुळे उत्पन्नात चाळीस पन्नास टक्के तर काही ठिकाणी ऐंशी टक्के घट होण्याची शक्यता आहे. पावसाअभावी तोंडावर आलेला रब्बी हंगामही वाया जाणार आहे. मागील काही दिवसांपासून भात काढणीची कामे सुरु झाली मात्र उत्पादन कमी मिळण्याच्या भीतीने बळीराजा चिंतातूर झाला आहे.

यावर्षी भाताच्या ओंब्या पूर्णपणे भरल्या नाहीत. त्यात दाणे चांगले न भरल्याने पाकडाचे प्रमाण जास्त आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. भात पिक चांगले आले तरच आदिवासीं शेतकऱ्यांचे वर्ष आर्थिकदृष्ट्या चांगले जाते. यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत उत्पादन कमी होणार आहे. भात साळींचा दर्जाही चांगला नसल्याचे सांगण्यात येते. या भागात भाताच्या इंद्रायणी, रायभोग आणि खडक्या आंबेमोहोर या प्रसिद्ध सुवासिक जातींचे उत्पादन घेतले जाते. भात काढणीनंतर रब्बी हंगामात वाटाणा, हरभरा अशी कडधान्याची पिके खाचरातील पाण्याच्या ओलीवर घेतली जातात. मात्र, ओलच नसल्याने यावर्षी ही पिके घेता येणार नाहीत.  

असमाधानकारक भातपिकामुळे आदिवासी शेतकऱ्यांत नाराजीची भावना आहे. पूर्व भागात टँकरची मागणी करण्यात आली. खरीप हंगामात उत्पादन घटले तर रब्बीचा हंगाम धोक्यात सापडला आहे. 

खरीप हंगामातील भात, सोयाबीन, भुईमूग पिकांचे भवितव्य धोक्यात आल्याने कर्जाचा डोंगर डोक्यावर घेतलेला कष्टकरी बळीराजा संकटात सापडला आहे. पुणे जिल्हात सर्वच तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना जुन्नर तालुका वगळण्यात आल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com