#PuneRains : मळद येथील तलाव फुटला; शेतकर्‍यांची जनावरे वाहून गेल्याने मोठे नुकसान

सावता नवले
Thursday, 15 October 2020

दौंड तालुक्यात पुणे-सोलापूर महामार्गाच्या दक्षिणेकडे गावांमध्ये बुधवारी (ता. 14) अतिवृष्टीमुळे ओढयांना पूर येऊन मळद येथील तीन वर्षापूर्वी बांधलेला तलाव रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास फुटला.

कुरकुंभ : दौंड तालुक्यात पुणे-सोलापूर महामार्गाच्या दक्षिणेकडे गावांमध्ये बुधवारी (ता. 14) अतिवृष्टीमुळे ओढयांना पूर येऊन मळद येथील तीन वर्षापूर्वी बांधलेला तलाव रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास फुटला. त्यामुळे ओढयाला पूर आल्याने मळद, रावणगाव येथील शेतकर्‍यांची जनावरे वाहून गेली.  परिसरातील सर्व पूल पाण्याखाली गेले तर  स्वामी चिंचोली येथील पूल वाहून गेल्याने गावाचा संपर्क तुटला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दौंड तालुक्यातील कुरकुंभ, जिरेगाव, पांढरेवाडी, वासुंदे, हिंगणीगाडा, मळद, रावणगाव, नंदादेवी, खडकी, स्वामी चिंचोली परिसरातील गावांमध्ये बुधवारी दिवसभर पावसाने थैमान घातले. त्यामुळे ओढयांना पूर आले. शेतांचे बांध फुटल्याने सर्वच  पिके भुईसपाट झाली. पूरांचे पाणी शेतात घुसल्याने माती खडकाबरोबर वाहून गेल्याने शेतकर्‍यांचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान झाले आहे.

Heavy Rain: सहा तासांचा थरार, पुरात वाहून जाणाऱ्या दोघांना वाचवले!

ओढयाना मोठ्याप्रमाणात पूर आल्याने मळद येथील तीन वर्षापूर्वी झालेला तलाव फुटला. त्यामुळे मळद, रावणगाव, खडकी, स्वामी चिंचोली येथील ओढयालगतच्या नागरिकांच्या घरे व गोठयांमध्ये पुराचे पाणी घुसले. या पुराने मळद येथील अशोक कोल्हे यांच्या पाच म्हशीचा मृत्यू झाला. तर शिवाजी दुधे, चंद्रकांत दुधे यांच्या शेळया, कोंबड्यांचा मृत्यू झाला.

Pune Rain:पुण्यात आज काय घडतंय? परीक्षा पुढे ढकलल्या, महापालिकेची हेल्पलाईन सुरू

रावणगाव येथील अण्णा रांधवण यांच्या चार जनावरांचा मृत्यू झाला. पुरामुळे ओढयावरील ठिकठिकाणचे पूल पाण्याखाली तर काही वाहून गेले. स्वामी चिंचोली गावाला जोडणाऱ्या डांबरीरस्त्याचा पूल वाहून गेल्याने गावाचा संपर्क तुटला. तसेच आरोग्य उपकेंद्राची इमारत पाण्यात गेल्याने त्यामध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकाची बोट पाण्याच्या वेगाने बोट उलटली. मात्र सुदैवाने कर्मचाऱ्याचे प्राण वाचले. हे आरोग्य कर्मचारी बुधवारी रात्रीपासून गुरूवारी सकाळी साडेनऊपर्यंत छतावर अडकलेले होते. अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणाचे दळणवळणाचे रस्ते वाहून गेले आहेत. त्यामुळे नागरिकांचे  जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाने तातडीने मदत व उपाययोजनांसाठी पावले उचलावीत अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी व ग्रामस्थांकडून होत आहे.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer's loss due to bursting of lake at Malad