निरवांगीमध्ये पाण्यासाठी उद्या शेतकऱ्यांचे रास्तारोको आंदोलन

राजकुमार थोरात
सोमवार, 19 मार्च 2018

इंदापूर तालुक्यामध्ये नीरा नदीवरील बंधाऱ्यामधील पाणी संपल्याने नीरा नदी कोरडी पडली अाहे. नदीमध्ये पाणी नसल्याने नदीकाठच्या गावांना पाणी टंचाईच्या झळा फेब्रुवारी महिन्यापासून सोसाव्या लागत आहेत.

वालचंदनगर -  नीरा नदी कोरडी पडली असून पाण्यासाठी इंदापूर
तालुक्यातील नदीकाठचे शेतकरी अाक्रमक झाले असून उद्या मंगळवार (ता. 20) निरवांगी (ता. इंदापूर) येथे नदीकाठच्या गावातील शेतकरी रास्तारोको आंदोलन करणार आहे. इंदापूर तालुक्यामध्ये नीरा नदीवरील बंधाऱ्यामधील पाणी संपल्याने नीरा नदी कोरडी पडली अाहे. नदीमध्ये पाणी नसल्याने नदीकाठच्या गावांना पाणी टंचाईच्या झळा फेब्रुवारी महिन्यापासून सोसाव्या लागत आहेत. मार्च महिना सुरु झाल्यापासून उन्हाची तीव्रता वाढल्याने पाण्याची टंचाई ही वाढली आहे. नदीकाठच्या गावातील पिण्याच्या पाण्याच्या योजना ही बंद पडल्या असून पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे.

हजारो एकरातील पिके धाेक्यात आली आहेत. नदीमध्ये पाणी सोडण्याची मागणी करुन ही प्रशासन वेळकाढूपणा करीत असल्याने नदीकाठचे शेतकरी आक्रमक झाले असून मंगळवार (ता. 20) रोजी नदीकाठच्या कळंब, निमसाखर, निरवांगी, दगडवाडी, खोरोची, पिठेवाडी, चाकाटी, बोराटवाडी,
सराटी, निरनिमगाव, भगतवाडी व माळशिरस तालुक्यातील बांगर्डे, पळसमंडळ, उंबरे, कदमवाडी परीसरातील शेतकरी रास्तारोको आंदोलन करणार आहेत. रास्तारोको आंदोलन करुनही प्रशासनाला जाग न आल्यास दोन दिवासानंतर नदीमध्ये उपोषण करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

Web Title: farmers rastaroko agitation for water in nirvangi