शिरूरचा बळीराजा वरुणराजाच्या हजेरीमुळे सुखावला 

rain
rain
Updated on

शिरूर (पुणे) : शिरूर शहर व पंचक्रोशीसह तालुक्‍याच्या जवळपास सर्वच भागांत विजांच्या लखलखाटासह पाऊस झाला. उष्म्याला छेदत मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मान्सूनपूर्व जलधारा काही भागात पहाटेपर्यंत; तर काही भागात आज दुपारपर्यंत हलक्‍या पावलांनी कोसळत होत्या. पंचक्रोशीत जवळपास दोन तास दमदार हजेरी लावलेल्या पावसाने सर्वत्र सुखद गारवा निर्माण केला. 

मे महिन्याचा उष्मा संपताना सगळ्यांचेच डोळे सात जूनच्या मान्सूनच्या आगमनाकडे लागले होते. परंतु, जून महिन्याच्या शुभारंभालाच वरूणराजाने हजेरी लावून दिलासा दिला. वादळाची शक्‍यता वर्तविल्याने त्याची धास्ती होती. मात्र, रिमझिम स्वरूपात शांत जलधारा कोसळल्या. शहर व पंचक्रोशीत दमदार; तर तालुक्‍याच्या इतर भागात मध्यम व हलक्‍या स्वरूपाचा पाऊस झाला. 

शिरूर मंडलात 15 मिलिमीटर, न्हावरे येथे 32, टाकळी हाजी येथे 31, वडगाव रासाई येथे 12, रांजणगावात 15, तळेगाव ढमढेरे येथे 8, मलठण येथे 40, पाबळ येथे सहा व कोरेगाव भीमा मंडलात पाच मिलिमीटर पाऊस झाला. 

एका रात्रीत झालेल्या एवढ्या पावसाने भविष्यातील पीक परिस्थितीबाबत शेतकरी वर्गाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. चारापिकांच्या वाढीस हातभार लावताना मूग, तूर, हुलगा, मटकी या खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीला हा पाऊस पोषक ठरणार असून, जमिनीची मशागत, नांगरणी ही कामे या पावसामुळे सुलभ होणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. 

तालुक्याच्या पूर्व भागातील मांडवगण फराटा, वडगाव रासाई, न्हावरे; तसेच तळेगाव, शिक्रापूर परिसरातही मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. त्याचा उसाला फायदा होणार आहे. शिरूर पंचक्रोशीत साडेबारा एकच्या दरम्यान सुरू झालेला पाऊस सुमारे दोन तास कोसळत होता. 

पुण्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे पंखे बंद पडून उकाडा जाणवू लागला. पण, काही वेळातच पावसानेच गारवा निर्माण केला. पाबळ, केंदूर भागात पहाटेपर्यंत संथ जलधारा बरसत होत्या. बेट भागात पहाटे दोननंतर पावसाला सुरवात झाली. पहाटेपर्यंत चालू असलेल्या या पावसाने शेतातील मातीचे छोटे बांध एकमेकांत मिसळले. निमोणे, गुनाट परिसरातील भूजल पातळी सुधारण्यास या पावसाने हातभार लागणार असल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com