कागदी घोडे नाचवण्यामुळे बळीराजाच्या पदरी निराशा

पराग जगताप
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

जुन्नर तालुक्‍यात गेल्या दोन वर्षात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. मात्र, सरकारने फक्त शेतकऱ्याच्या पिकांचे पंचनामे करणे, नुकसानीचे फॉर्म भरून घेणे आणि आर्थिक मदतीच्या आश्‍वासनाचे फक्त कागदी घोडे नाचवले. त्यातून बळीराजाच्या पदरी फक्त निराशाच पडली. सर्व सरकारी प्रक्रिया पार पाडण्यासाठी वेळ व पैसा वाया गेला आहे. मात्र, अद्याप दुष्काळातील नुकसानीबाबत कोणतीही मदत शेतकऱ्याच्या पदरात पडली नाही. 

ओतूर (पुणे) : जुन्नर तालुक्‍यात गेल्या दोन वर्षात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. मात्र, सरकारने फक्त शेतकऱ्याच्या पिकांचे पंचनामे करणे, नुकसानीचे फॉर्म भरून घेणे आणि आर्थिक मदतीच्या आश्‍वासनाचे फक्त कागदी घोडे नाचवले. त्यातून बळीराजाच्या पदरी फक्त निराशाच पडली. सर्व सरकारी प्रक्रिया पार पाडण्यासाठी वेळ व पैसा वाया गेला आहे. मात्र, अद्याप दुष्काळातील नुकसानीबाबत कोणतीही मदत शेतकऱ्याच्या पदरात पडली नाही. 

जुन्नर तालुक्‍यात मागील वर्षी पाऊस कमी झाला. त्यामुळे तालुक्‍यातील एकूण नऊ कृषी मंडलांपैकी सहा मंडले दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केली होती. जुन्नर, नारायणगाव, बेल्हे, निमगाव सावा, ओतूर, वडगाव या सहा कृषी मंडलांना दुष्काळग्रस्त जाहीर केले; तर डिंगोरे, राजूर व आपटाळे ही तीन कृषी मंडले समाधानकारक पाऊस झाल्याने दुष्काळग्रस्त जाहीर केली गेली नाहीत. परंतु, या तीनही मंडलांत परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने हाती आलेली सर्व पिके नष्ट झाली. तालुक्‍यात मागील वर्षी दुष्काळी परिस्थिती होती, जी सरकारने कागदोपत्री मान्य केली, मात्र तरीही दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एक रुपयाचीही आर्थिक मदत झाली नाही. या उलट पंचनामे व इतर फॉर्म भरून कागदी घोडे नाचविण्यात शेतकऱ्याचा वेळ व पैसा वाया गेला. 

जुन्नर लुक्‍यात या वर्षी प्रथम "क्‍यार' वादळाने व नंतर महावादळाने हाहाकार माजवला. अवकाळी पावसाने तालुक्‍यातील शेती व पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. काही भागात रस्त्यांचीही दुरवस्था झाली. पावसाने संपूर्ण खरीप हंगामच शेतकऱ्यांच्या हातातून वाया गेला आहे. सोयाबीन पीक काढणी पावसामुळे अर्धवट सोडावी लागली. शेतातील सोयाबीनचे उभे पीक सडून गेले, तर सुड्या घालून ठेवलेल्या सोयाबीनला पाणी घुसल्याने कोंब फुटले. मका, ज्वारी, शाळूच्या कणसांनाही कोंब फुटून संपूर्ण पीक वाया गेले. द्राक्षाचा एक हंगाम सोडून देण्याची वेळ आली आहे. कांदा बी, कांदा रोपे व कांदा लागवड केलेल्या शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशीच परिस्थिती टोमॅटो, मिरची, काकडी व इतर पिकांची झाली आहे. 

सरकारकडून पुन्हा पंचनामे करत कागदी घोडे नाचवायला सुरुवात झाली आहे. बाधित शेतकरी ठोस मदत मिळण्याबाबत साशंकता व्यक्त करत आहेत. पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळवून देण्यासाठी कठोर भूमिका बजावणे गरजेचे आहे. पीक विमा नसलेल्यांना आर्थिक मदत देणे गरजेचे आहे. 
एकूणच जुन्नर तालुक्‍यात मागील वर्षी पाण्याचा दुष्काळामुळे व या वर्षी ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यावर ओढवलेल्या या अस्मानी व सुलतानी संकटातून शेतकरी पुन्हा उभा करण्यासाठी सरसकट कर्जमाफी किंवा आर्थिक मदत देणे, कर्जाचे पुनर्गठन करणे, यासारखी पावले उचलणे गरजेचे आहे. या बरोबर विविध पिकांना हमीभाव देणे गरजेचे आहे. याबाबत शासनाने गंभीरपणे विचार करून अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers still waiting for help