शेतकऱ्यांचे एक रुपयाचेही नुकसान होणार नाही - मोदी

modi-pawar
modi-pawar

पुणे - ‘‘हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा रद्द केल्यामुळे तुमचे एका रुपयाचेही नुकसान होणार नाही. मला फक्त ३० डिसेंबरपर्यंतचा वेळ द्या,’’ अशा ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी नागरिकांना येथे दिली. ‘‘दैनंदिन आर्थिक व्यवहार पूर्ववत व्हावेत, यासाठी युद्धपातळीवर सरकार प्रयत्न करत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

पाचशे-हजाराच्या नोटा रद्द केल्यामुळे नागरिकांना होत असलेल्या गैरसोयीची मोदी यांनी व्हीएसआय येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात दखल घेतली. ते म्हणाले, ‘‘या निर्णयामुळे त्रास होणार, गैरसोय होणार हे अपेक्षित होते; पण या निर्णयाने ७० वर्षांपासून देशाला लागलेल्या बनावट नोटांच्या रोगातून मुक्त होण्याचा मार्ग सापडेल. देशाच्या भावी पिढीसाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे. त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकाने याला सहकार्य करावे.’’ 

काही लोक असेही असतील की ज्यांचा त्रास थोडा जास्त असेल, असे म्हणत मोदी यांनी काळ्या पैशांचा व्यवहार करणाऱ्यांना लक्ष्य केले. ते म्हणाले, ‘‘यातून सुटण्यासाठी ते काही-काही प्रयत्न करत आहेत; पण मला त्यांची काळजी नाही. मला देशाच्या सामान्य माणसांची काळजी आहे. ५०० रुपयांसाठी तुम्हाला ४९९ रुपयेदेखील घेण्याची गरज नाही. तुमचे संपूर्ण पैसे तुम्हाला मिळतील. हजार रुपयांपेक्षा दहा रुपयेदेखील कुणी कमी घेण्याची आवश्‍यकता नाही. हे सर्व निर्णय आठ नोव्हेंबरच्या आत घेता येत नव्हते. अन्यथा ही गोष्ट गुप्त राहिली नसती. त्यामुळे ज्यांच्या घरांत पैशांची पोती भरली आहेत, त्यांनी लगेचच पर्यायी व्यवस्था केली असती. मी गरिबांसाठी आणि सामान्यांच्या हक्कांसाठी आहे.’’

मोदी म्हणाले, ‘‘जनता पक्षाचे सरकार असताना १९७८ मध्ये तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी एक हजार रुपयांची नोट चलनातून बंद केली होती. त्यानंतर संयुक्त आघाडी सरकारने २५ पैसे बंद केले. मोरारजींच्या काळात भारतीय रिझर्व्ह बॅंकेने हजाराच्या १४५ कोटी रुपयांच्या नोटा छापल्या होत्या. त्यापैकी ८० कोटी रुपये लोकांमध्ये होते. उर्वरित पैसे बॅंकांमध्ये होते. सध्या भारतात पाचशे-हजार रुपयांच्या नोटांची किंमत १४ लाख करोड रुपये आहेत. समाजकंटक आणि देशद्रोह्यांनी त्याचा फायदा उठविला आहे. त्या आता समूळ नष्ट करण्याचे पाऊल उचलले नसते, तर भावी पिढीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या व्यवस्थेने मोठा अडथळा निर्माण केला असता.’’ 

शेतकऱ्यांवर कोणताही कर नाही ः मोदी

‘‘हजार-पाचशेच्या नोटा चलनातून रद्द केल्या आहेत. या निर्णयाबद्दल शेतकऱ्यांमध्ये जाणीवपूर्वक गैरसमज पसरविले जात आहेत. या नोटा आता बॅंकेत भराव्या लागणार आणि मोदी त्यावर कर लावणार, अशा अफवा पसरविल्या जात आहेत; पण माझ्या शेतकरी बंधूंनो, तुमच्यावर कोणताच कर लावला जाणार नाही. तुम्ही निश्‍चिंत राहा. हा देश तुमचा आहे, ते पैसे तुमचे आहेत, ही बॅंक तुमची आहे आणि हा मोदीदेखील तुमचा आहे,’’ असे मोदी यांनी सांगताच सभागृहात टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. 

नकली नोटांची शेती

‘‘आपले शत्रू त्यांच्या देशात जेवढ्या चलनी नोटा छापतात, त्यापेक्षाही जास्त आपल्या नकली नोटांची शेती करतात. या नकली नोटा ते देशात आणतात. दहशतवाद, नक्षलवाद यांना याच नोटा मिळतात. त्याच माध्यमातून शस्त्रास्त्रांची खरेदी होती. दहशतवादाला यातून बळ मिळते. हे जे काही देशांच्या विरोधात सुरू होते, ते समूळ नष्ट करण्याची गरज होती. त्यामुळे ८ तारखेला रात्री आठ वाजता देशाच्या चलनातून ५०० आणि एक हजारच्या नोटा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला. देशाच्या जनतेने या निर्णयाला आशीर्वाद दिले आहेत,’’ असे मोदी यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com