esakal | pune : ‘लंपी’च्या प्रादुर्भावामुळे शेतकरी चिंतेत
sakal

बोलून बातमी शोधा

ANIMALS

Pune :‘लंपी’च्या प्रादुर्भावामुळे शेतकरी चिंतेत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

किरकटवाडी : कधी अतिवृष्टी, कधी नापिकी, तर मागील वर्षापासून कोरोना संकटामुळे अडचणीत सापडलेले शेतकरी व दुग्ध व्यावसायिक आता जनावरांना वेगाने संसर्ग वाढत चाललेल्या ‘लंपी’ या विषाणूजन्य आजारामुळे चिंतेत आहेत. या आजाराची लागण झाल्यानंतर एका जनावरावर तब्बल नऊ ते दहा हजार रुपये उपचार खर्च करावा लागत असल्याने शेतकरी आर्थिक संकटातही सापडले आहेत. सद्यःस्थितीत शहराला लागून असलेल्या गावांमध्ये हा आजार मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

पुणे शहराच्या पश्चिम भागातील नांदेड, नऱ्हे, किरकटवाडी, नांदोशी, खडकवासला तसेच शहराला लागून असलेल्या इतर गावांमधील जनावरांना लंपीची लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरात हा आजार पसरत आहे. गाय, बैल या जनावरांना लंपीची लागण होण्याचे प्रमाण जास्त असून म्हशींनाही संसर्ग होत आहे.

लागण झाल्यानंतर पंधरा दिवस उपचार करावे लागत असल्याने नऊ ते दहा हजार रुपये खर्च यासाठी शेतकऱ्यांना करावा लागत आहे. तसेच खासगी पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून जनावरांना लंपी प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठीही प्रत्येकी ८०० ते १००० हजार रुपये शेतकरी व दुग्ध व्यावसायिकांना खर्च करावे लागत आहेत. बाधित जनावरे निरोगी जनावरांच्या संपर्कात आल्याने माशा, डास, गोचीड यांच्यामुळे बाधित जनावरांच्या संपर्कातील वस्तू, बांधण्याच्या ठिकाणी निरोगी जनावरांचा वावर यामुळे हा आजार पसरतो.

हेही वाचा: पुणे : सदाशिव पेठेत कार्यालयास आग

सुमारे ८० हजार जनावरांचे लसीकरण सद्यःस्थितीत पूर्ण झाले आहे. लंपीचा संसर्ग वाढत असल्याने तातडीने वाढीव लशींची मागणी केली आहे. समाज माध्यमांतून या आजाराबाबत जनजागृती करण्यात येत आहे. ग्रामपंचायतींनाही माहिती देण्यात आली आहे. आजाराची लागण झालेल्या जनावरांवर उपचार करण्यासाठी शेतकऱ्यांनी परिसरातील सरकारी पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा.

- डॉ. शीतलकुमार मुकणे, पशुसंवर्धन उपआयुक्त, पुणे

‘लंपी’ची लक्षणे

लंपी हा जनावरांना होणारा विषाणुजन्य त्वचारोग आहे. यामध्ये जनावरांच्या शरीरावर काळे फोड येऊन जखमा होतात. गाय, बैल व म्हैस वगळता इतर जनावरांमध्ये (शेळी, मेंढी) हा आजार आढळून आलेला नाही. आजार झाल्यानंतर जनावरांना ताप येणे, डोळे व नाकातून स्राव गळणे, अंगावर गाठी येणे, लाळ गळणे, पायांना सूज येणे, चारा न खाणे, दुभत्या जनावरांच्या दुधात घट होणे अशी लक्षणे दिसून येतात.

प्रतिबंधात्मक उपाय

निरोगी जनावरांचे लसीकरण करून घेणे, लागण झालेल्या जनावरांना निरोगी जनावरांपासून दूर ठेवणे, बाह्यपरोपजीवी नियंत्रणासाठी १ लिटर पाणी, १० मिली करंज तेल, १० ग्रॅम अंगाचा साबण हे मिश्रण जनावरांच्या अंगावर व गोठ्यात तीन दिवसांच्या अंतराने तीन वेळा फवारावे. आजाराची लागण झाल्यानंतर पशुवैद्यकीय तज्ज्ञांकडून योग्य औषधोपचार करून घ्यावेत.

हेही वाचा: Pune : साखर कामगारांना मिळणार दिलासा

खासगी डॉक्टरांकडून जनावरांना लस घेण्यासाठी आठशे ते हजार रुपये लागतात. आजाराची लागण झाल्यानंतरही उपचारांसाठी मोठा खर्च करावा लागतो. सरकारी लस व उपचार मिळाल्यास शेतकऱ्यांचा खर्च वाचेल.

- प्रवीण दसवडकर, बैलमालक, खडकवासला

खानापूर व परिसरात किरकोळ प्रमाणात या आजाराची लागण झाली आहे. सरकारी दवाखान्याकडून जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्हीही योग्य प्रकारे जनावरांची काळजी घेत आहोत.

- नीलेश जावळकर,

दुग्ध व्यावसायिक, खानापूर

loading image
go to top