फास्टॅग यंत्रणा कुसगावात सुसज्ज

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

फास्टॅग अंमलबजावणीचा वाहनचालकांना फायदा होणार आहे. व्यवस्थापन आणि कर्मचारी यांच्याशी होणारे वाद आणि हुज्जत कमी होणार असून, वाहतूक कोंडी आणि वेळेची बचत होणार आहे. चालकांनी फास्टॅग लावून सहकार्य करावे.
- सचिन भोने, व्यवस्थापक, कुसगाव टोल नाका

कामशेत - पुणे-मुंबई महामार्ग क्रमांक चारवरील कुसगाव (वरसोली) टोल नाक्‍यावर फास्टॅग सक्ती करण्यात आलेली नाही. मात्र, येथील यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित आहे. आठही लेनवर फास्टॅग सेवा उपलब्ध आहे. स्थानिकांना कारसाठी पंचवीस टक्के, तर मालवाहक वाहनांसाठी पन्नास टक्के मासिक सवलत देण्यात येत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रस्ते विकास महामंडळाच्या आदेशाने लवकरच सर्व वाहनांना फास्टॅग सक्तीची अंमलबजावणी होणार असल्याने वाहनचालक व मालकांनी या नव्या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन व्यवस्थापनाने केले आहे. फास्टॅगच्या वाहनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. स्कॅनिंग होऊन अवघ्या तीन ते पाच सेकंदात वाहन टोलनाका पास करते. दहा किलोमीटरमधील खासगी वाहनधारकांना (व्हाइट प्लेट) २५ टक्के म्हणजे २६० रुपयांत मासिक पासाची सोय असून, येलो प्लेट वाहनधारकांना पन्नास टक्के म्हणजे ५२५ रुपयांत मासिक पास देण्याची व्यवस्था केली आहे. २४ अंकी हॅशटॅगची टोलनाक्‍यावरील काऊंटरला नोंद करून मासिक पास घेता येईल. ज्यामुळे टोल दराची रक्कम वजा करता येणार आहे.
सहकार ग्लोबल संचलित हा टोलनाका असून, सर्व नियमांची काटेकोर अंमलबजावणी होणार असल्याचे व्यवस्थापक सचिन भोने यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fastag System ready in kusgav toll naka