Fastag Update - खेड-शिवापूर टोल नाक्यावर दुपारनंतर गोंधळ

टीम ई सकाळ
Tuesday, 16 February 2021

पुणे-सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर टोल नाक्यावर मंगळवारी शंभर टक्के फास्टॅगद्वारे टोल वसुली सुरू करण्यात आली.

खेड-शिवापूर - शंभर टक्के फास्टॅगद्वारे टोल वसुली अंमलबजावणीच्या पहिल्या दिवशी खेड-शिवापूर टोल नाक्यावर दुपारपर्यंत फास्टॅग यंत्रणा सुरळीत सुरू होती. मात्र  दुपारनंतर दुप्पट टोल देताना प्रवासी आणि टोल कर्मचारी यांच्यात होणाऱ्या वादामुळे टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा लागल्या. त्यामुळे प्रवाशांना फास्टॅग अंमलबजावणीच्या पहिल्याच दिवशी मनस्ताप सहन करावा लागला. 

पुणे-सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर टोल नाक्यावर मंगळवारी शंभर टक्के फास्टॅगद्वारे टोल वसुली सुरू करण्यात आली. खेड-शिवापूर टोल नाक्यावर पूर्वी स्थानिक नागरीकांना टोल फ्री सोडण्यात येत होते. त्यामुळे शंभर टक्के फास्टॅग टोलवसुली सुरू झाली तरी आम्ही टोल भरणार नाही, असा पवित्रा स्थानिक नागरिकांनी घेतला होता. तसेच खेड-शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीनेही स्थानिकांकडून टोल घेतल्यास आंदोलन करण्याचा ईशारा दिला होता. मात्र मंगळवारी खेड-शिवापूर टोल नाक्यावर स्थानिक नागरीकांना विना टोल सोडण्यात येत होते. तर इतर फास्टॅग नसलेल्या वाहनांकडून मात्र दुप्पट टोल आकारणी करण्यात येत होती. 

पुण्यातील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

दुपारपर्यंत टोल नाक्यावर फास्टॅग यंत्रणा सुरळीत सुरू होती. मात्र दुपारनंतर दुप्पट टोल देताना वाहन चालक आणि टोल कर्मचारी यांच्यामध्ये जागेवरच वाहने थांबवून वाद होत होते. त्यामुळे पाठीमागे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पुण्याच्या बाजूला जाणाऱ्या टोल नाक्यावरील फास्टॅग मार्गिका आणि रोख स्वरूपातील मार्गिकेतही वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. 

"मुलाच्या परीक्षेसाठी सांगलीहून पुण्याला निघालो होतो. परंतु येथील टोल नाक्यावर वाहतुक कोंडीत आम्हाला अर्धा तास थांबावे लागले. याठिकाणी आमचा खूप वेळ वाया गेला." अशी प्रतिक्रिया प्रवासी कल्पना महाडिक यांनी व्यक्त केली.  

हे वाचा - पुण्यात गोमांस घेऊन जाणारा टेम्पो पडकला; चालक फरार

याबाबत पुणे-सातारा टोल रोडचे व्यवस्थापक अमित भाटीया म्हणाले, "फास्टॅग नसलेल्या वाहनांकडून दुप्पट टोल घेतला जात आहे. मात्र दुप्पट टोल देताना प्रवासी टोल कर्मचाऱ्यांशी वाद घालत आहेत. त्यात वेळ वाया जात असल्याने टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या."


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fastag update pune implement issue traffic double charge