पिता-पुत्राच्या धाडसामुळे चोरट्यांचे पलायन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

भोर - शहरातील शिक्षक सोसायटीतील बंद सदनिका फोडून चोरीचा प्रयत्न करणाऱ्या चार चोरट्यांना पिता-पुत्राने धाडसाने रोखले. त्यांच्या प्रतिहल्ल्यामुळे अखेर चोरट्यांना पलायन करावे लागले. या झटापटीत पिता-पुत्रासह एक चोरटाही गंभीर जखमी झाला आहे. शिवगंगा इमारतीच्या जी विंगमधील दुसऱ्या मजल्यावर रविवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास ही घटना घडली.

भोर - शहरातील शिक्षक सोसायटीतील बंद सदनिका फोडून चोरीचा प्रयत्न करणाऱ्या चार चोरट्यांना पिता-पुत्राने धाडसाने रोखले. त्यांच्या प्रतिहल्ल्यामुळे अखेर चोरट्यांना पलायन करावे लागले. या झटापटीत पिता-पुत्रासह एक चोरटाही गंभीर जखमी झाला आहे. शिवगंगा इमारतीच्या जी विंगमधील दुसऱ्या मजल्यावर रविवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास ही घटना घडली.

डॉ. विठ्ठल पांडुरंग धोंडे (वय ५२) व त्यांचा मुलगा अभिजित (वय २१) अशी जखमी झालेल्या पिता-पुत्रांची नावे आहेत. पोलिस खात्यात नोकरीला असलेले चंद्रकांत बाबूराव दुधाणे हे लग्नकार्यामुळे घराला कुलूप लावून पुण्यास राहण्यास गेले आहेत. त्यामुळे त्यांची सदनिका गेल्या काही दिवसांपासून बंद होती. चोरट्यांनी रविवारी मध्यरात्री इमारतीच्या खालच्या दोन मजल्याच्या सदनिकांना बाहेरून कडी लावली आणि दुसऱ्या मजल्यावरील दुधाणे यांच्या सदनिकेचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.

दरवाजाचा आवाज आल्याने पहिल्या मजल्यावरील काही महिलांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. परंतु, दरवाजा बाहेरून बंद असल्याने एका महिलेने तिसऱ्या मजल्यावरील डॉ. धोंडे यांच्या पत्नीला फोन करून चोरटे असल्याची शक्‍यता वर्तविली. त्यानंतर डॉ. विठ्ठल धोंडे हे मुलगा अभिजितसह घराबाहेर पडले. इमारतीमधील नागरिकांच्या हालचाली चोरट्यांना जाणवल्याने त्यांनी पळ काढण्यास सुरवात केली. परंतु डॉ. धोंडे पिता-पुत्रांची जिन्यामध्ये त्यांच्यासमवेत झटापट झाली. चोरट्यांनी हातातील कटावणी व विटाच्या तुकड्यांनी धोंडे पिता-पुत्रांना मारण्यास सुरवात केली. त्यानंतर दोघांनी काठ्यांच्या सहाय्याने चोरट्यांवर हल्ला केला. त्यात एक चोरटा गंभीर जखमी होऊन खाली पडला; परंतु इतर तिघांनी त्यास उचलून घेऊन संरक्षक भिंतीवरून उड्या मारून पळून गेले.

घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक पांडुरंग सुतार यांनी सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी धाव घेतली आणि चोरट्यांच्या दिशेने शोधमोहीम राबविली. परंतु त्यांना यश आले नाही. अनंतराव थोपटे महाविद्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या पाण्याच्या टाकीजवळून एक मोटार गेल्याचे नागरिकांनी सांगितले.

उशिरापर्यंत फिर्याद नाही
दुधाणे यांच्या सदनिकेतील कपाटामधील साहित्य अस्ताव्यस्त पसरले होते. पण, सदनिकेतून काहीही चोरीला गेले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत भोर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झालेली नव्हती. 

Web Title: Father Son Theft