'एफडीए'चा बडगा

'एफडीए'चा बडगा

पुणे - वाढदिवसापासून ते रक्षाबंधनापर्यंत आणि अधिक महिन्याच्या वाणापासून ते ‘थर्टी फर्स्ट’चं ‘सेलिब्रेशन’ म्हटले पुणेकरांची पावले आपोआप हॉटेलकडे वळतात. शनिवार आणि रविवारच हॉटेलमधले ‘वेटिंग’, तर आता आपल्या अंगवळणीच पडलंय. ही वस्तुस्थिती एकीकडे असतानाच दुसरीकडे शहर आणि जिल्ह्यातील तपासलेल्यापैकी ९५ टक्के हॉटेलच्या किचनमध्ये स्वच्छता नसल्याने त्यांना ‘अन्न व औषध प्रशासन’ने (एफडीए) सुधारणा नोटीस बजावली असल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. 

गेल्या काही वर्षांपासून हॉटेलची संख्या वेगाने वाढल्याचे आपल्याला रस्त्या-रस्त्यांवरून फिरताना जाणवते; पण त्यातील अन्नाची गुणवत्ता हा आतापर्यंत दुर्लक्षित घटक होता. बाहेरून चकाचक दिसणाऱ्या, ग्राहकाला आदराने सेवा देणाऱ्या या हॉटेलच्या किचनची स्थिती भयंकर असल्याचे चित्र अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना तपासणीमध्ये दिसले. 

लोकांना सुरक्षित अन्न मिळण्यासाठी हॉटेलची तपासणी सुरू आहे. हॉटेलला सुधारण्याची संधी देण्यात आली आहे. त्यानंतरही सुधारणा न केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.
- सुरेश देशमुख, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन, पुणे विभाग

हॉटेलमधील मूलभूत स्वच्छतेत आमूलाग्र सुधारणा झाली आहे. ‘हॅंड ग्लोव्हज’ घालण्यापासून ते कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तपासणीपर्यंत सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे. त्यामुळे सुमारे ८० टक्के त्रुटींमध्ये सुधारणा झाली आहे. उर्वरित दोष हे तांत्रिक स्वरूपाचे आहेत. त्यात टप्प्या-टप्प्याने सुधारणा सुरू आहे.
- गणेश शेट्टी, अध्यक्ष, हॉटेल व्यावसायिक संघटना

कारवाईचा उद्देश काय?
विक्री होणारा प्रत्येक अन्न घटक ग्राहकांसाठी सुरक्षित असावा, असा अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याचा उद्देश आहे. त्यामुळे हॉटेलमध्ये प्रत्येक घास सुरक्षित करण्यासाठी ही तपासणी मोहीम मेपासून सुरू करण्यात आली आहे. हॉटेलमधील दोष दाखविण्यापेक्षा त्यात सुधारणा करण्यावर भर देण्यात येत आहे. मात्र, सुधारणा न करणाऱ्या हॉटेलवर कारवाईचा बडगा उगारावा लागत असल्याचे ‘एफडीए’तर्फे सांगण्यात आले. 

स्वच्छतेचा लवलेश नाही
हॉटेलच्या किचनमध्ये अन्न तयार करताना स्वच्छतेच्या मूलभूत गोष्टींचाही विचार केला जात नसल्याचे अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी केलेल्या प्राथमिक तपासणीतून दिसून आले आहे. अन्न तयार करण्याची जागा स्वच्छ असावी, अन्नावर झाकण ठेवलेले असावे, स्वयंपाक करणाऱ्याचे हात स्वच्छ असावेत, नखे काढलेली असावीत, जवळ रुमाल, टॉवेल असावा, अशा सवयी अभावानेच आढळल्या. त्यामुळे हॉटेलच्या तपासणीतून ठळकपणे पुढे आलेले दोष सुधारण्याची संधी त्यांना देण्यात आली आहे. त्यासाठी तपासलेल्या हॉटेलपैकी ९५ टक्के हॉटेलला सुधारणा नोटीस बजावली आहे, अशी माहिती अन्न सुरक्षा अधिकारी वंदना रूपनवर यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com