कामगारांची बेकऱ्यांबाहेर राहण्याची सोय करा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जानेवारी 2017

पुणे - कोंढव्यातील आगीत सहा कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्यानंतर शहरातील तपासणी केलेल्या 54 पैकी 16 बेकऱ्यांमध्ये कामगार राहतात, अशी माहिती अन्न व औषध प्रशानासाने (एफडीए) केलेल्या तपासणीतून पुढे आली आहे. या कामगारांची तत्काळ दुसरीकडे राहण्याची व्यवस्था करावी, असे आदेश बेकरीमालकांना देण्यात आले आहेत. 

कोंढव्यातील बेकरीला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर शहर, जिल्ह्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर येथील बेकऱ्यांची तपासणीची मोहीम "एफडीए'ने हाती घेतली आहे. त्यापैकी शहर आणि जिल्ह्यातील बेकऱ्यांच्या तपासणीची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. त्याबाबत "एफडीए'च्या पुणे विभागाचे सहआयुक्त शिवाजी देसाई म्हणाले, ""शहर आणि जिल्ह्यातील 54, तर पुणे विभागातील 71 बेकऱ्यांची तपासणी गेल्या दोन दिवसांमध्ये केली आहे. त्यासाठी स्वतंत्र पथक नेमण्यात आले आहे. शहर आणि जिल्ह्यातील 54 बेकऱ्यांची तपासणी केली. त्यातून 16 ठिकाणी कामगार बेकरीतच राहात असल्याचे समोर आले आहे. या बेकऱ्यांच्या मालकांना नोटिसा दिल्या आहेत.'' 

तपासणी केलेल्यांपैकी 13 बेकऱ्या विनापरवाना असल्याचे आढळले आहे. त्यांनी अन्नपदार्थ उत्पादनाचा परवाना घेण्याची सूचना देण्यात आली आहे. तसेच, बहुतांश बेकऱ्यांमध्ये स्वच्छतेचा अभाव जाणवला. कामगारांचे वैयक्तिक आरोग्य हा एक त्यातील महत्त्वाचा तपासणीतील मुद्दा आहे, असेही त्यांनी सांगितले. 

बेकऱ्यांमध्ये स्वच्छतागृहाची पुरेशी व्यवस्था नाही आणि जेथे आहे ती स्वच्छ नाहीत. कच्चा माल ठेवण्याची आणि तयार पदार्थ ठेवण्याची जागा अस्वच्छ असल्याचे चित्र यातून दिसल्याचेही देसाई यांनी स्पष्ट केले.

Web Title: FDA Orders bakery owners