#NaturalMango आंब्यांच्या गुणवत्तेवर एफडीएची नजर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मे 2019

येथे नोंदवा तक्रार
कार्बाईड वापरून कृत्रिमरीत्या आंबे पिकविले जात असल्याची तक्रार तुम्ही थेट प्रशासनाकडे आता करू शकता. त्यासाठी १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून तुम्हाला तक्रार नोंदविला येईल.

पुणे - तुम्ही खरेदी करत असलेला प्रत्येक आंबा चांगलाच असावा, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) यंत्रणा सक्रिय केली आहे. मार्केट यार्डमधून सातत्याने आंब्याचे नमुने घेण्यात येत असून, त्याच्या तपासण्यांवर भर देण्यात येत आहे.

शहरात गेल्या काही वर्षांपासून अन्नसुरक्षा व मानके कायद्यानुसार कॅल्शियम कार्बाईड या रसायनापासून आंबे पिकविण्यास बंदी घातली आहे. आंबे पिकविण्यासाठी व्यापाऱ्यांकडून आरोग्यास घातक कॅल्शियम कार्बाईडचा वाढत असलेला वापर पाहता ‘एफडीए’ने इथेपॉनला परवानगी दिली आहे.  ‘इथेपॉन’ पावडर स्वरूपामध्ये फळाशी प्रत्यक्षात संपर्कात न आणता सॅचेटमध्ये वेष्टन करून वापरण्याची सूचना केली आहे; तसेच आंबे नैसर्गिकरीत्या पिकवावेत, अशा सूचनाही ‘एफडीए’ने आंबा व्यापाऱ्यांना दिल्या आहेत.

‘एफडीए’चे सहायक आयुक्त संजय शिंदे म्हणाले, ‘‘शहरातील मुख्य फळ मार्केट असलेल्या 

छत्रपती शिवाजी महाराज उत्पन्न बाजार समितीतील फळ व्यापाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यावर सातत्याने देखरेख ठेवण्यात येत आहे. त्यामुळे 

सध्या मार्केट यार्डमध्ये कॅल्शियम कार्बाईड कुठेही आढळलेले नाही. आंब्याचा दर्जा तपासण्यासाठी दोन ठिकाणचे नमुनेही काढण्यात आले आहेत.’’

‘एफडीए’चे सहआयुक्त सुरेश देशमुख म्हणाले, ‘‘पुणेकरांना चांगले आंबे मिळण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे. त्याअंतर्गत आंब्याचे औपचारिक तसेच, अनौपचारिक नमुनेही काढले जात आहेत. कार्बाईड सापडल्यास मालाची जप्ती करावी, अशा सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.’’

कॅल्शियम कार्बाईडचे दुष्परिणाम
कॉल्शियम कार्बाईडमध्ये आर्सनिक व फॉस्फरस ही घातक रासायनिक द्रव्ये असतात. त्यामुळे उलट्या, जुलाब, छातीत व पोटात जळजळ होते. अशक्तपणा; तसेच कर्करोगासारखे विकार होण्याचा धोका असतो. 

असा करा इथेपॉनचा वापर
अन्नसुरक्षा व मानके कायद्यानुसार फळे पिकविण्यासाठी इथेपॉनला परवानगी दिली आहे. त्यातील तरतुदीनुसार फळे पिकविण्यासाठी फळ, फळाची जात परिपक्वता यानुसार १०० ‘पीपीएम’ (०.०१ टक्के) इथिलीन गॅसचा रायपनिंग चेंबरमध्ये वापरण्यास परवानगी आहे. 

येथे नोंदवा तक्रार
कार्बाईड वापरून कृत्रिमरीत्या आंबे पिकविले जात असल्याची तक्रार तुम्ही थेट प्रशासनाकडे आता करू शकता. त्यासाठी १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून तुम्हाला तक्रार नोंदविला येईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: FDA watch the quality of mangoes