‘पाले’ गावावर दरड कोसळण्याची भीती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

पाले येथील कड्याला दोन वर्षांपूर्वी वीज पडून भेग पडली होती. त्यानंतर ग्रामसभा घेऊन पुनर्वसनाबाबत चर्चा झाली. पुनर्वसन करण्याबाबत लोकांची सहमती आहे. पुनर्वसनासाठी सोयीचे काही गट क्रमांकही नागरिकांनी सुचविले आहेत. त्याची माहिती तहसीलदारांना दिलेली आहे. अद्याप, पुढील सूचना मिळालेल्या नाहीत.
- आर. सी. राऊत, ग्रामसेविका, करंजगाव

करंजगाव - सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं नाणे मावळातील पाले गाव. डोंगराच्या पायथ्याशी. पावसाळ्यात दरड कोसळून माळीण गावाप्रमाणे पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी दोन वर्षांपूर्वीच पुनर्वसनाबाबत ग्रामसभेने ठराव केलेला. मात्र, अद्याप प्रशासनाकडून काहीही हालचाल झालेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांना जीव मुठीत धरून राहावे लागत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्य विधी मंडळाचे अधिवेशन लवकरच सुरू होणार आहे. केंद्रात भारतीय जनता पक्षाचे तर राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना महाआघाडीचे सरकार आहे. अर्थात मावळचे खासदार शिवसेनेचे आणि आमदार राष्ट्रवादीचे आहेत. म्हणजेच दोन्हीही लोकप्रतिनिधी महाआघाडीचे आहेत. त्यांनी या ज्वलंत प्रश्‍नाला अनुक्रमे संसदेत व विधिमंडळात मांडले तर मावळातील डोंगर दऱ्या खोऱ्यांत राहणाऱ्यांचा प्रश्‍न पावसाळ्यापूर्वी मार्गी लागेल, अशी अपेक्षा आहे.  

पालेचे माजी उपसरपंच संतोष आसवले म्हणाले, ‘‘ग्रामसभेच्या माध्यमातून आम्ही तहसीदारांना पुनर्वसनाबाबत दोन वर्षांपूर्वी प्रस्ताव दिलेला आहे. नैसर्गिक आपत्ती कधीही येऊ शकते. त्यामुळे पुनर्वसन गरजेचे आहे.’’

धोका वाढलाय 
मावळात झालेले अवैध उत्खनन, वेगवेगळ्या प्रकल्पांसाठीचे संपादन, बेसुमार वृक्षतोड, धनिकांनी बांधकामासाठी केलेला निसर्गाचा ऱ्हास असा अनेक कारणांनी नैसर्गिक प्रवाह बदलले आहेत. विशेषत: सह्याद्रीच्या डोंगररांगेत वसलेल्या या गावांमध्ये हे बदल दिसत आहेत. डोंगर, दऱ्या खोऱ्यांतील या गावांचे पुनर्वसन करणे ही काळाची गरज आहे. 

या गावांनाही धोका
पाले गावासह भाजे, पाटण, ताजे, बोरज, देवघर, वेहरगाव, शिलाटणे, जेवरेवाडी, देवले, नेसावे, पाले, करंजगाव (मोरमारेवाडी), जांभवली, घोणशेत, साई व वाऊंड ही गावेसुद्धा 
डोंगराच्या पायथ्याशी आहेत. त्यांनाही दरड कोसळण्याचा धोका संभवतो. येथील ग्रामस्थ जीव धोक्‍यात घालून जीवन जगत आहेत. त्यांच्यावरही धोक्‍याची टांगती तलवार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fear of falling fences on Pale village