Chakan MIDC : चाकण औद्योगिक वसाहतीतील काही कंपन्या स्थलांतरीत होण्याची भीती

चाकण येथील चाकण औद्योगिक वसाहतीला अमेरिकेतील डेट्रॉईट म्हणून ओळखले जाते.
Chakan-MIDC
Chakan-MIDCsakal

चाकण - येथील चाकण औद्योगिक वसाहतीला अमेरिकेतील डेट्रॉईट म्हणून ओळखले जाते. ऑटोमोबाईल कंपन्यांची, वाहन उद्योगांची एक मोठी वसाहत म्हणून चाकण औद्योगिक वसाहत जगात नावारूपाला आली आहे. औद्योगिक वसाहतीत अनेक पायाभूत समस्या सध्या कंपन्यांना भेडसावत आहेत. त्यामुळे काही कंपन्या स्थलांतर करण्याच्या प्रयत्नात आहेत. काही कंपन्यांनी स्थलांतर यापूर्वी केले आहे.

राज्य सरकारचे वाढते कर, अपुऱ्या सोयी,सुविधा येथील मुख्यमार्गांची दुरावस्था, वाहतूक कोंडी यामुळे उद्योजक, कंपन्यांचे प्रतिनिधी, कामगार वैतागले आहेत. या वास्तवतेमुळे इतर कंपन्या येथे येण्यास सध्या धजावत नाही. राज्य सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे असे अनेक उद्योजक कंपनी प्रतिनिधींचे म्हणणे आहे.

चाकण औद्योगिक वसाहतीत नाणेकरवाडी,खराबवाडी, मेदनकरवाडी, कुरुळी,निघोजे, महाळुंगे, शिंदे, वासुली, भांबोली, वराळे, आंबेठाण, सावरदरी, खालुंब्रे या भागातील जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. औद्योगिक वसाहतीमध्ये बहुराष्ट्रीय कंपन्या मोठ्या प्रमाणात आहेत.

औद्योगिक वसाहतीत बजाज ऑटो, महिंद्रा फोक्सवॅगन, मर्सिडीज बेंज, हुंडाई,सॅनी इंडिया, जीई, गॅब्रियल, स्पायसर, लॉरियल, एअर लिक्विड, फिलिप्स, बॉश अशा मोठ्या, छोट्या अशा सुमारे चार हजारावर कंपन्या आहेत. चाकण औद्योगिक वसाहतीतील काही कंपन्यांना परराज्याचे वेध लागले आहेत.

इतर कारणे सांगून येथील प्रकल्प बंद करू लागले आहेत. चाकण औद्योगिक वसाहतीत विविध समस्या उद्योजकांना,कंपनी प्रतिनिधींना भेडसावत आहेत.त्यामुळे औद्योगिक वसाहतीतील काही कंपन्यांमध्ये स्थलांतर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

चाकण औद्योगिक वसाहत 1993 पासून मोठ्या प्रमाणात वाटचाल करू लागली. या वसाहतील बजाज ऑटो कंपनी येथे आल्यानंतर तसेच कुरूळी येथे भारत फोर्ज चा प्रकल्प झाला त्यानंतर औद्योगीकरणाने वेग घेतला. तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख असताना त्यांनी खालुंब्रे येथील गायरान जमिनीवर हुंडाईचा प्रकल्प आणला.

त्यानंतर खालुंब्रे, सावरदरी, शिंदे, वासुली, भांबोली, वराळे, आंबेठाण या भागात औद्योगिक विकास होण्यासाठी चालना मिळाली. एमआयडीसीच्या वतीने या भागात अंतर्गत रस्त्यांचे जाळे मोठ्या प्रमाणावर करण्यात आले. त्यामुळे अंतर्गत दळणवळणाची सुविधा वाढली.

महाळुंगे, खराबवाडी, नाणेकरवाडी, निघोजे, कुरुळी या भागात कंपन्यांचे जाळे मोठ्या प्रमाणात वाढले गेले. निघोजेत महिंद्राचा प्रकल्प उभा राहिला. त्या खालोखाल या कंपन्यांना माल पुरवणाऱ्या, स्पेअर पार्ट पुरविणाऱ्या कंपन्या, लॉजिस्टिक कंपन्या या परिसरात आल्या. गोदामे उभी राहिली.

सुमारे चार हजारावर छोटे-मोठे उद्योग या परिसरात उभे राहिले. या औद्योगिक वसाहतीसाठी सुमारे दहा हजार एकर जमिनीचे क्षेत्र व्यापले गेले आहे. विविध कंपन्याकडून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला महसूल मिळतो. वीज, पाणीपुरवठा, रस्ते देण्याची जबाबदारी एमआयडीसीची आहे.

अंतर्गत रस्त्यांची कामेही निकृष्ट दर्जाची असल्याने दरवर्षी या रस्त्यावर खड्डे पडतात. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्नही उभा राहतो आहे . स्थानिक ग्रामपंचायतच्या वतीने ही कंपन्यांना सुविधा मिळत नाही.औद्योगिक वसाहतीच्या अंतर्गत रस्त्यांना जोडणारे मुख्य रस्ते म्हणजे पुणे -नाशिक महामार्ग, तळेगाव -चाकण -शिक्रापूर मार्ग या रस्त्यांची अवस्था तर अतिशय बिकट आहे.

या मार्गावरून कंटेनर, ट्रेलर ट्रक, बस, टँकर आदी वाहने मोठया प्रमाणात ये -जा करतात. परंतु या मार्गांची अवस्था अतिशय बिकट आहे. या मार्गाना पावसाळ्यात तळ्याचे स्वरूप आलेले असते. मार्गावर वाढलेल्या वाहनामुळे वाहतूक कोंडी सातत्याने होत आहे. मुख्य मार्गावर सातत्याने कामगारांचे व इतरांचे अपघात होत आहेत. त्यामुळे मुख्य मार्ग हा मृत्यूचा सापळा झाला आहे. मार्गावर वाहतूक करणे म्हणजे जिकीरीचे झालेले आहे.

या मुख्य मार्गावरील वाहतूक कोंडीला उद्योजक, कामगार, कंपनी प्रतिनिधी सारेच वैतागले आहेत. चाकण औद्योगिक वसाहतीत मोठ्या प्रमाणात बहुराष्ट्रीय कंपन्या असल्याने मोठी गुंतवणूक आहे. परंतु या औद्योगिक वसाहतीमध्ये वीज, पाणीपुरवठा दळणवळणाच्या सोयी सुविधा अपुऱ्या पडत आहेत त्यामुळे कंपन्यांचे प्रतिनिधी,उद्योजक, कामगार हैराण झाले आहेत.

ठेकेदारीचा, गुन्हेगारीचा मोठा फटका...

औद्योगिक वसाहतीतील विविध गावातील काही नेते, कार्यकर्ते, गुंड कंपन्यात ठेके, माथाडी कामगार ठेके मिळविण्यासाठी धडपडत असतात. ठेके हे काही कार्यकर्ते, नेते यांनाच मिळाले पाहिजेत असा त्यांचा होरा आहे. त्यामुळे कंपनीचे अधिकारी, उद्योजक यांच्याशी त्यांची वादावादी होते.ठेका मिळविण्यासाठी काही गुंड प्रवृत्तीचे लोकही कंपन्यात घुसतात.

काही आमदार, मंत्री, काही अधिकारी ही ठेके मिळविण्यासाठी प्रयत्न करतात. त्यातून संघर्ष उभे राहतात. त्यामुळे ठेका कोणाला द्यायचा यासाठी कंपनीचे प्रशासन, उद्योजक यांच्यासमोर प्रश्न उभे राहतात. आम्हीच कामगार पुरवणार, आम्हाला ठेका पाहिजे त्यामुळे बाहेरून येणारे व गाववाले यांच्यात संघर्ष उभा राहतो.

ठेकेदारीचा मोठा फटका कंपन्यांना बसतो आहे. त्यामुळे काही कंपन्यांचे अधिकारी, उद्योजक, प्रतिनिधी नाराज आहेत. काही पोलीस अधिकारी,पोलीस कर्मचारी कंपन्यांमध्ये ठेके मिळविण्याचा प्रयत्न करतात. अगदी भंगाराचे ठेके मिळविण्यासाठीही गुंडागर्दी होते. त्यातूनही कंपन्यावर दबाव येतो. हे वास्तव आहे.

अपुऱ्या सोयी सुविधा....

मुख्य रस्ते पुणे - नाशिक महामार्ग, तळेगाव- चाकण शिक्रापूर मार्ग या मार्गांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था आहे. या मार्गावर सातत्याने होणारी वाहतूक कोंडी त्यामुळे कंपनीचे अधिकारी, कर्मचारी, उद्योजक सारेच वैतागले आहेत. वाहतूक कोंडीमुळे कंपनीतील कामगार कामावर वेळेवर येत नाही. कंपनीचा माल वेळेवर पोहोचला जात नाही. त्यामुळे या परिसरात कंपन्या टाकून काय उपयोग असाही कंपनीचे अधिकारी, उद्योजक यांचा सवाल येतो आहे.

याबाबत उद्योजक योगेश वाके, विजय बोत्रे यांनी सांगितले की,' कर वाढलेले आहेत. येथील कंपन्यांना मोठ्या प्रमाणात कर भरावा लागतो. कंपन्यांना जोपर्यंत या परिसरात सबसिडी मिळत होती.तोपर्यंत कंपन्या या परिसरात राहत आहेत. सबसिडी बंद झाल्यानंतर कंपन्या या भागातून दुसऱ्या राज्यात स्थलांतर करू लागल्या आहेत.

काही कंपन्या कामगारांचे प्रश्न,कामगारांना वाढीव वेतन देणे या व इतर कारणामुळे स्थलांतर करण्याचा प्रयत्न करत आहेत. कंपन्यांना कर्नाटक, तेलंगणा, गुजरात, छत्तीसगड या राज्यात सबसिडी मोठ्या प्रमाणात दिली जाते. त्यामुळे काही कंपन्या येथे दहा, पंधरा वर्षे राहिल्यानंतर दुसऱ्या राज्याचा विचार करतात.

सरकारने कंपन्या बाबतीत वेगळे धोरण आखण्याची गरज आहे. कंपन्यांना पायाभूत सुविधा देण्याबरोबरच वेगळ्या पद्धतीने करांची आखणी करणे गरजेचे आहे. नवीन उद्योग या भागात कसे येतील यासाठी व जे उद्योग सध्या सुरू आहेत ते या भागातून स्थलांतर करणार नाहीत. यासाठी वेगळे धोरण आखण्याची गरज आहे."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com