भयमुक्तीसाठी प्राधिकरणातील तरुणांची शक्ती

पीतांबर लोहार
बुधवार, 11 जुलै 2018

पिंपरी - आपण बाहेरगावाहून आलात किंवा कामावरून घरी जाण्यासाठी आकुर्डी रेल्वे स्थानकावर उतरलात तर, घाबरण्याचे कारण नाही.

बिनधास्तपणे जा. कारण, प्राधिकरणातील ५० तरुणांच्या पथकाने रात्रं-दिन गस्त घालून संपूर्ण रेल्वे स्थानक परिसर भयमुक्त केला आहे. गेल्या दोन महिन्यांत १७ गुन्हेगारांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्यातील चार अल्पवयीन होते. 

पिंपरी - आपण बाहेरगावाहून आलात किंवा कामावरून घरी जाण्यासाठी आकुर्डी रेल्वे स्थानकावर उतरलात तर, घाबरण्याचे कारण नाही.

बिनधास्तपणे जा. कारण, प्राधिकरणातील ५० तरुणांच्या पथकाने रात्रं-दिन गस्त घालून संपूर्ण रेल्वे स्थानक परिसर भयमुक्त केला आहे. गेल्या दोन महिन्यांत १७ गुन्हेगारांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्यातील चार अल्पवयीन होते. 

आकुर्डी व निगडी प्राधिकरणासह बिजलीनगर, वाल्हेकरवाडी, रेलविहार, गुरुद्वारा परिसर, डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुल, रावेत, पुनावळे परिसरात नागरी वस्ती वाढली आहे. शाळा-महाविद्यालयांसह खासगी वसतिगृहे आहेत. या भागाचा उच्चभ्रू लोकवस्ती असा लौकिक आहे. आकुर्डी रेल्वे स्थानकावरून ये-जा करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रात्री-अपरात्री येणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. मात्र, पोलिस चौकी नसल्याने आकुर्डी रेल्वे स्टेशन सुरक्षेच्या दृष्टिने कमकुवतच आहे. त्याचा गैरफायदा गुन्हेगार घ्यायचे. चोरी, पाकिटमारी, लूटमार व्हायची. परिसरात गर्दुल्यांचेही बस्तान होते. याची कुणकुण प्राधिकरण नागरी कृती समितीला लागली आणि आकुर्डी रेल्वे स्थानक परिसर भयमुक्त करण्याचा संकल्प त्यांनी केला. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी देहूरोडला जावून लोहमार्ग पोलिस व रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांच्या सूचनेनुसार रेल्वे स्थानक परिसरात गस्त घालणे सुरू केले. त्यासाठी ५० स्वयंसेवक नियुक्त केले.

रेल्वे कर्मचारी व अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळाले आणि गुन्हेगार गजाआड होऊ लागले. गर्दुल्यांचे अड्डे उद्‌ध्वस्त केले. दोन महिन्यांत १७ गुन्हेगारांना पकडले. त्यांतील १३ जणांविरुद्ध रेल्वे न्यायालयात खटले दाखल केले आहेत. चार जण अल्पवयीन असल्याने त्यांना सुधारगृहात पाठविले आहे. 

समितीचे स्वयंसेवक 
अध्यक्ष विजय पाटील, अमोल कानू, अर्चना घाळी, विजय मुनोत, ॲड. विद्या शिंदे, विभावरी इंगळे, गौरी सरोदे, रेखा भोळे, सुरेखा सोनवणे, बाबासाहेब घाळी, संतोष चव्हाण, मनोज ढाके, अमृत महाजनी, अमित डांगे, जयेंद्र मकवाना, जयप्रकाश शिंदे, सतीश देशमुख, लक्ष्मण इंगवले, विशाल शेवाळे, राम सुर्वे, मंगेश घाग, संदीप सकपाळ, राजकुमार कांबीकर, नाना कुंबरे, उमेश कांगुडे, प्रदीप पिलाने, बळिराम शेवते, शिवाजी अडसूळ, विजय जगताप, नितीन मांडवे, अजय घाडी, तेजस सापरिया, अश्‍विन काळे, समीर चिले, सतीश मांडवे, राजेश बाबर, बापू गोरे, स्वप्नील चव्हाणके, भरत उपाध्ये, उद्धव कुंभार.

चोरी, लूटमार, मुलींना त्रास देणे, ब्लेड मारणे असे प्रकार आकुर्डी रेल्वे स्टेशनवर नेहमीच व्हायचे. काही तरुणांनी अशा गुन्हेगारांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. समाजासाठी चांगले काम आहे.
- राजेश पुरी, रेल्वेप्रवासी, वाल्हेकरवाडी

गर्दीच्या लोकल गाड्यांमध्ये चोरी, लूटमारीचे प्रकार होतात. आमच्याकडून अनेकदा कारवाई केली जाते. त्या ठिकाणी पोलिसांची नियुक्ती केलेली असते. नागरिकांनीही दक्ष राहायला हवे.
- एक पोलिस अधिकारी, लोहमार्ग पोलिस

आकुर्डी रेल्वे स्थानकावर प्रतीक्षालय म्हणून दोन खोल्या आहेत. त्यातील एक खोली पोलिस चौकीसाठी उपलब्ध होऊ शकते. त्यासाठी रेल्वे मंत्रालय व गृहविभागाकडे पाठपुरावा करणार आहे.
- विजय पाटील, अध्यक्ष, प्राधिकरण नागरी कृती समिती

Web Title: Fearless Railway Station campaign youth police