रोखीच्या व्यवहारांवर अतिरिक्त पंचवीस रुपये

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

वारजे - येथील फेडरल बॅंक नियमबाह्यरीत्या ग्राहकांकडून रोखीच्या व्यवहारांवर पंचवीस रुपये जास्त घेत आहे. ही फसवणूक असल्याची तक्रार पालकांनी केली आहे. 

वारजे - येथील फेडरल बॅंक नियमबाह्यरीत्या ग्राहकांकडून रोखीच्या व्यवहारांवर पंचवीस रुपये जास्त घेत आहे. ही फसवणूक असल्याची तक्रार पालकांनी केली आहे. 

श्री स्वामी समर्थ ज्ञानपीठाच्या सह्याद्री नॅशनल शाळेच्या विद्यार्थ्यांची फी या बॅंकेत भरली जाते. विद्यार्थ्यांचे पालक आपली फी रोखीने या बॅंकेत भरतात; मात्र १ एप्रिल २०१८ पासून बॅंक प्रत्येक रोखीच्या व्यवहारावर पालकांकडून पंचवीस रुपये जास्तीचे घेत आहे. त्यासंदर्भात त्यांनी बॅंकेमध्ये नोटीसही लावली आहे. या शाळेमध्ये २७०० विद्यार्थी शिकतात. प्रत्येक विद्यार्थ्याला तीन टप्प्यात फी भरण्याची परवानगी दिलेली आहे. या प्रत्येक व्यवहारावर फेडरल बॅंक पंचवीस रुपये जास्त घेत आहे. हे जास्तीचे जमा होणारे पंचवीस रुपये शाळेच्या खात्यावरही जमा होत नाहीत अथवा पालकांना त्याची वेगळी पावतीही मिळत नाही. पालकांनी या संदर्भात बॅंकेला विचारणा केली असता रिझर्व्ह बॅंकेचा तसा नियम आहे, असे सांगण्यात आले; मात्र आरबीआयचा नियम दाखवा, असे विचारल्यानंतर बॅंकेने कोणतेही पत्र दाखवले नाही.

पंचवीस रुपये जास्त का घेतले जातात, अशी बॅंकेकडे विचारणा केली असता, तुम्ही तुमच्या शाळेला विचारा, असे सांगितले जात आहे.
- सरिता पाटोळे, पालक

रोखीने व्यवहार केल्यास  पंचवीस रुपये जास्त घ्यावेत, असा आरबीआयचा नियम असल्याचे फेडरल बॅंकेने सांगितले आहे; मात्र रिझर्व्ह बॅंकेचा असा कोणताही नियम नाही, हे आम्हाला आता कळाले असल्याने बॅंकेला विचारणा करणार आहोत.
- विजय बराटे, अध्यक्ष, सह्याद्री संकुल     

बॅंकेच्या अधिकाऱ्यांनीच कॅश हॅंडलिंग चार्जेस घ्यावे, असे सांगितल्याने आम्ही पालकांकडून पंचवीस रुपये जास्त घेत आहोत. तसे आम्ही शाळेला कळवले होते.
- प्राजक्ता गायकवाड, फेडरल बॅंक 

Web Title: Federal Bank Cash Transaction Extra Money Board