"इनकमिंग'आवरा; अन्यथा विरोधी बाकावर बसू 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जानेवारी 2017

कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या लोकप्रतिनिधींविषयी नेहमीच बोलणारा भाजप आणि संघ पुण्यातील "इनकमिंग'वर गप्प का आहे. आमच्याकडील लोक त्यांच्याकडे गेले की गंगेत डुबकी मारल्यासारखे स्वच्छ कसे काय होतात? हा दुटप्पीपणा आहे. स्वच्छ प्रतिमेचा आभास आहे. 
- अनंत गाडगीळ, कॉंग्रेसचे आमदार 

पुणे - काहीही करून सत्ता काबीज करण्यासाठी सुरू असणाऱ्या "इनकमिंग'वर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्येच तीव्र नाराजी आहे. "सत्ता आणि लक्ष्मीदर्शनाने येणाऱ्या इच्छुकांना आवर घाला, नाहीतर अनुकूल वातावरण असतानाही विरोधी बाकावर बसावे लागेल', अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांकडे हे कार्यकर्ते आपल्या भावना व्यक्त करणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही "इनकमिंग'ची गंभीर दखल घेतली असून, पक्षश्रेष्ठींकडे योग्य तो संदेश पोचविण्यात येणार असल्याचे समजते. 

लोकसभा, विधानसभा निवडणुकीत पक्षाला पुण्यात मिळालेले शतप्रतिशत यश, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचे कायम असणारे वलय, नोटाबंदीनंतरही नगरपालिका निवडणुकीत मिळालेले यश, यामुळे भाजपमध्ये येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. आतापर्यंत विविध पक्षांतील अर्धा डझन नगरसेवक भाजपमध्ये दाखल झाले असून, ते निवडणुकीच्या तयारीलाही लागले आहेत. मुख्यमंत्री बुधवारी (ता. 4) पुण्यात असून, या भेटीतही आणखी काही प्रवेश होणार असल्याचे समजते. पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देताच हे प्रवेश होत असल्याबद्दल पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काळ्या पैशाच्या विरोधात मोहीम सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही स्वच्छ प्रतिमा आहे, असे असताना पुण्यात मात्र, गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असणाऱ्यांसह अनेकांना प्रवेश दिला जात आहे. ज्यांच्या मार्फत हे प्रवेश होत आहेत, त्यांची विविध प्रकरणांमध्ये चौकशी सुरू आहे. पक्षाच्या प्रतिमेस हे हानिकारक आहे. तरुणांचा पक्षाला असणारा पाठिंबा यातून गमावला जाण्याची भीती कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. पक्षासाठी आम्ही आयुष्य घातले, आता चांगले दिवस आले की, आम्हाला डावलले जात आहे. ज्यांना प्रवेश देत आहात, त्यांची जनमानसातील प्रतिमा तरी पाहा, असे आवाहन काही पदाधिकाऱ्यांनी केले आहे. याबाबत वरिष्ठांकडे तक्रारही करण्यात आली आहे. 

कार्यकर्त्यांसाठी काही जागा ठेवा 
"पक्ष कार्यकर्त्यांसाठी काही जागा राखून ठेवा, असे म्हणण्याची आमच्यावर वेळ आली आहे,' अशी प्रतिक्रिया पक्षातील एका युवा नेत्याने "सकाळ'कडे व्यक्त केली. या प्रकाराची संघाच्या वतीने गंभीर दखल घेण्यात आली आहे. इतर पक्षातील नगरसेवकांना पक्षात घेण्यासंदर्भात वापरण्यात येत असलेल्या कार्यपद्धतीवरही तीव्र आक्षेप घेण्यात आला आहे. वेळीच योग्य ठिकाणी "इंजेक्‍शन' दिले जाईल, असेही एका पदाधिकाऱ्याने सांगितले. 

Web Title: Feeling BJP workers