पुण्यातील नानावाड्यातील संग्रहालय पाहण्यासाठी आता शुल्क

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020

सरकारी शाळांना मोफत, तर खासगी शाळांना शुल्क
नानावाड्यासाठी प्रवेश शुल्क निश्‍चित करताना महापालिका आणि सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना मात्र मोफत प्रवेश राहणार आहे. तसेच, दिव्यांगांकडूनही शुल्क घेतले जाणार नाही; पण खासगी शाळांतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीसाठी शुल्क आकारले जाणार आहे.

पुणे - नानावाड्यातील स्वराज्य क्रांतिकारक संग्रहालय पाहण्यासाठी येणाऱ्या लहान मुलांना दहा रुपये, तर प्रौढांना २५ रुपये शुल्क आकारले जाणार आहे. याशिवाय परदेशी पर्यटकांकडून तीनशे रुपये घेतले जाणार आहेत. या शुल्क वसुलीस स्थायी समितीने मंगळवारी मंजुरी दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नानावाड्याच्या नूतनीकरणानंतर त्याचे उद्‌घाटन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जूनमध्ये झाले. त्यानंतर हे संग्रहालय कुलूपबंद होते. त्यामुळे शनिवार वाडा, लाल महल पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना मात्र, नानावाडा पाहता येत नव्हता, त्यामुळे त्यांच्यात नाराजी होती. 

पुणे शहरात गुरुवारी पाणीपुरवठा बंद 

या पार्श्‍वभूमीवर नानावाड्यासाठीचे प्रवेश शुल्क निश्‍चित करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने तयार करून तो स्थायी समितीपुढे ठेवला. त्यानुसार लहान म्हणजे बारा वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी दहा, तर प्रौढासाठी २५ रुपये  शुल्क आकारले जाणार आहे.

तानाजी मालुसरेंच्या पुण्यतिथीला अजय देवगण सिंहगडावर येणार?

नानावाड्यातील तळमजल्यावरील विविध खोल्यांमध्ये सशस्त्र क्रांतिकारकांचे जीवनचरित्र माहितीफलक, दृक-श्राव्य व ध्वनिफितीच्या स्वरूपात मांडण्यात आले आहे. उमाजी नाईक, वासुदेव बळवंत फडके, लहुजी वस्ताद, लोकमान्य टिळक, चापेकर बंधू, आदिवासींचा उठाव, १८५७  चे स्वातंत्र्यसमर आदी क्रांतीच्या उठावाचा पट उलगडून दाखविण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fees now to view the museum at Nanavada in Pune