पुणे : बसमधील महिला चोरट्यांची टोळी अशी घेतली ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

बसमधील महिला चोरट्यांची टोळी ताब्यात
​महिला वाहकाच्या प्रसंगावधानामुळे सर्व स्तरांतून कौतुक

पिंपरी : पीएमपीमध्ये चोरीचा धुमाकूळ घालणाऱ्या महिला चोरट्यांच्या टोळीमुळे नागरिक तसेच चालक-वाहकही हैराण झाले होते. भोसरी डेपोतील महिला वाहकाने जिवाची बाजी लावून महिला चोरट्यांची टोळी पकडली. "सकाळ'ने प्रसिद्ध केलेल्या बातमीचे चांगलेच पडसाद शहरभर उमटले. "महिला चोरांची टोळी पकडा अन्‌ पाच हजार रुपये मिळवा' या शीर्षकाखाली शुक्रवारी (ता. 7) वृत्त प्रसिद्ध झाले होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आळंदी ते देहू मार्गावर धावणाऱ्या बस मार्ग क्रमांक 309.3, बस क्रमांक 558 (एमएच-12 केक्‍यू 0174) या बसमध्ये हा प्रकार 7 तारखेला सायंकाळी 4.30 वाजता घडला. प्रवासी शैला अय्यंगार या हडपसरहून आळंदी- देहूमार्गे याच बसने प्रवास करत होत्या. त्याच दरम्यान चिखली बोऱ्हाडेवस्ती येथे बसमध्ये चढलेल्या महिला टोळीतील तीन महिलांनी मिळून अय्यंगार यांची पर्स चोरली. त्यानंतर दुसऱ्या बॅगेतून मोबाईल चोरणार तेवढ्यात त्या सावध झाल्या. आरडाओरडा केल्यानंतर महिला वाहक माधवी लांडगे (वाहक क्रमांक डी- 5135) यांनी प्रसंगावधान दाखवत महिला चोरट्यांना पकडले.

अभिमानास्पद ! 'ही' व्यक्ती होणार देशातील पहिली मूकबधिर सरपंच

त्यानंतर बसची दोन्ही दारे बंद करून बस चिखली चौकात आणली. पोलिस चौकी लवकर न सापडल्याने त्यांनी रस्त्यावरील पोलिसांना मदतीला बोलावले. त्यानंतर भोसरी स्थानकप्रमुख बंडू भालेकर व नितीन पळसकर यांच्याशी महिला वाहकाने संपर्क केला. चोरीचा घडलेला प्रसंग चिखली पोलिसांना सांगितला. त्वरित महिला चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली व तक्रार नोंदवून घेतली. पीएमपी संचालक शंकर पवार यांनी जाहीर केल्याप्रमाणे पाच हजार रुपयांचे बक्षीस वाहक महिलेला दिले जाणार आहे.

पीएमपी वाहतूक व्यवस्थापक व बस व्यवस्थापक यांनी बसमध्ये चोऱ्या करणाऱ्या महिला टोळीवर कडक कारवाई करून पीएमपीतील चोऱ्या थांबवाव्यात, अशी मागणी पोलिसांकडे केली आहे. मात्र, पोलिस अशा चोऱ्यांच्या तपासाकडे काणाडोळा करत असल्याचे पीएमपी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: female thieves caught in alandi dehu PMP bus