अभिमानास्पद ! 'ही' व्यक्ती होणार देशातील पहिली मूकबधिर सरपंच

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

  • मध्य प्रदेशातील घटना
  • अनुसूचित जमातीतील एकमेव उमेदवार

इंदोर : अपंगत्वावर मात करून धाडस दाखविणाऱ्या लोकांचे नेहमीच कौतुक होत असते. मध्य प्रदेशातील दानसरी गावातील २७ वर्षीय मूकबधिर युवकाने सरंपच होण्याची तयारी केली असून, यानुसार तो भारतातील पहिला मूकबधिर सरपंच ठरण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

इंदोरपासून चाळीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या दानसरी गावाची लोकसंख्या हजाराच्या आसपास आहे. या गावात अलीकडेच ग्रामपंचायतीची स्थापना झाली आहे. रोटेशनप्रमाणे सरपंचपदी गावातील लोक लोकशाहीच्या मार्गाने निवडून येत आहेत. आता सरपंचपद अनुसूचित जमाती (एसटी)साठी सुटले असून गावातील एकमेव अनुसूचित जमातीतील मतदार असणारा मूकबधिर लालू हाच एकमेव सरपंचपदासाठी उमेदवार ठरू शकतो. दानसरी गावाची निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही, मात्र आगामी सरपंचपद एसटीसाठी सुटणार असल्याने गावकरी कामाला लागले आहेत.

इकडे मनसे जोमात; राष्ट्रवादी कोमात

लालू याचे आई-वडील त्याच्या लहानपणीच दगावले असून, तो शेतीकाम करत आहे. गावातील समस्या त्याला चांगल्या ठाऊक असून, तो सरपंच होण्यासाठी उत्सुक आहे. सामाजिक कार्यकर्ते ग्यानेंद्र पुरोहित हे लालूशी हातवारे, खुणा करत संवाद साधतात. याबाबत पुरोहित म्हणतात, की सरपंच होण्यासाठी लालूने तयारी दाखविली आहे. तो अर्ज भरण्यासाठी तयार आहे. सरपंच झाल्यानंतर तो गावात विकासकामे करू इच्छित आहे. रस्ते चांगले करण्याची तयारी आहे. मूकबधिर लोकांसाठीही त्याला काम करायचे आहे. लालूला सरपंच करण्यासाठी गावकऱ्यांनी प्रचार सुरू केला आहे.

संघनेते पी. परमेश्वरन यांचे निधन; मोदी, शहा यांच्यासह अनेकांची श्रद्धांजली

लालू सरपंच झाल्यास मूकबधिर श्रेणीतील लोकांना प्रतिनिधित्व मिळेल, असे पुरोहित यांनी सांगितले. गावातील तरुण राहुल सोनाग्रा म्हणतो, की लालू हा फार शिकलेला नसला तरी गावातील समस्येची त्याला चांगली माहिती आहे. तो सरपंच म्हणून गावच्या विकासासाठी काम करेल, असा आम्हाला विश्‍वास आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lalu likely to be countrys first deaf-mute sarpanch in Madhya Pradesh