फेस्टिव्हल ऑफ फ्युचर : वेगळ्या क्षेत्रांतही संधी

Business
Business

हेल्थ अँड न्यूट्रिशनमधील संधी
केवळ खेळणे हेच आरोग्य क्षेत्रातील करिअर नसून न्यूट्रिशन, सप्लिमेंट, उपचार यांसारख्या वेगवेगळ्या क्षेत्रांतही अनेक संधी आहेत. त्याचा तरुणांनी लाभ घ्यावा, असा सूर हेल्थ अँड न्यूट्रिशनमधील संधी या विषयावरील चर्चासत्रात उमटला. त्यामुळे केवळ पारंपरिक अभ्यासक्रमांकडेच ओढा असणाऱ्या विद्यार्थ्यांना एक नवीन दिशा मिळण्यास मदत झाली.

जितेंद्र चोक्‍सी, संस्थापक, एफआयटीटीआर - तुम्ही जर कष्ट घेतले तर यश मिळते. केवळ तीन महिन्यांत वजन कमी करणे म्हणजे फिटनेस नसून फिटनेसची संस्कृती रुजायला हवी. पाच माणसे एकत्र येऊन काही करीत असतील, तर ते नक्कीच चांगले असणार, हा समज काढून टाका. ते पाच जण खरेच चांगले काही करत आहेत का, असा प्रश्‍न तुम्हाला पडला पाहिजे. 

 फिटनेस आणि न्यूट्रिशनबद्दल केलेल्या मार्गदर्शनाचा लोकांना उपयोग होत असल्याचे लक्षात आल्यावर कंपनी सुरू 
 याबाबत लिहिलेल्या पुस्तकाचा २५ हजार जणांना लाभ. तरी प्रत्यक्ष मार्गदर्शनाची गरज. 
 एक लाख जणांना प्रशिक्षण, कंपनीची वार्षिक उलाढाल १०० कोटी रुपये

विशाल गोंडल, संस्थापक, गोक्‍यूआयआय - भारत हा असाध्य रोगांची राजधानी आहे. आपल्या आरोग्यव्यवस्थेचा विश्‍वास हाच मोठा प्रश्‍न आहे. देशातील ही पारंपरिक व्यवस्था लोकांचा विश्‍वास संपादू शकलेली नाही. प्रेरणा नसल्याने आरोग्य चांगले राखले जात नाही. भारतीयांचे सरासरी आर्युमान ६७ आहे ते ८० पर्यंत न्यायला हवे. प्रतिसादावर आधारलेली व्यवस्था नसल्यानेच कोरोना व्हायरस मोठ्या प्रमाणात पसरला. आजारी पडल्यानंतर काळजी घेणारे आरोग्याचे मॉडेल दीर्घकाळ टिकणारे नसते. 

 देशातील ९० टक्के लोकांचा आरोग्यव्यवस्थेवर विश्‍वास नाही 
 आरोग्याशी संबंधित उत्पादन चांगले असेल आणि त्याच्या निर्मात्यावर लोकांचा विश्‍वास असेल तर चांगले यश 
 भविष्यात वेअरेबल इक्विपमेंट्‌स, इम्लांटस या बाबी महत्त्वाच्या ठरतील

सिद्धार्थ देशमुख, संस्थापक, अरिमाया व्हेंचर्स - मी एक नापास धावपटू आणि जबरदस्तीने झालेला अभियंता आहे. मात्र, फिटनेस क्षेत्रात करिअर करायचे ठरविले. त्यातूनही स्वत:ची कंपनी सुरू केली. तुमचे स्वप्न म्हणजे तुम्ही झोपेत असताना बघता ते नव्हे, तर ज्यामुळे तुम्हाला झोप येत नाही ते तुमचे स्वप्न असते. आयुष्यात मी येथे असेन असे ठरवा, त्यादृष्टीने प्रयत्नशील राहा. 

 फिटनेसमध्ये केवळ खेळांचाच समावेश नसतो
 न्यूट्रिशन, सप्लिमेंट, जिओलिंक्‍ड जाहिरातींचे प्रसारण यासारख्या बाबीही महत्त्वाच्या 
    फिटनेस आणि न्यूट्रिशन या क्षेत्रात २०२२ पर्यंत पाच लाख रोजगार शक्‍य

प्रसाद कुलकर्णी, संस्थापक, प्रसादिती मेडिकल इक्विपमेंट्‌स - मी आरोग्य क्षेत्राशी संबंधित पुनर्वसनाच्या क्षेत्रात काम करतो. मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला असतानाच वेगळे काही करण्याचे स्वप्न होते. त्यातूनच मेडिकल इक्विपमेंटच्या क्षेत्रातील कंपनी सुरू केली. ज्या रुग्णांच्या हाताच्या कोपऱ्याची व्यवस्थित हालचाल होत नाही त्यांच्यासाठी रोबोटिक एल्बो आर्म तयार केला. थोडक्‍यात छोटे शोध, छोटे उद्योग यामधूनच देशाची व्यवस्था पाच ट्रिलियन अमेरिकन डॉलरपर्यंत जाऊ शकते. 

 आरोग्याकडे पुरेसे लक्ष न दिल्यास पुनर्वसनाची वेळ संभवते
 कंपनीची उत्पादने बघून केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाकडून अर्थसाह्य 
 अस्थिरोगाशी संबंधित आजार झालेल्यांपैकी अनेकांना पुनर्वसनाची गरज

स्टार्टअपमध्ये यशाचा मार्ग

‘वैविध्यपूर्ण क्षेत्रातील करिअरच्या संधी’
पूर्वी करिअर करण्यासाठी अनेक जण ठराविक क्षेत्र निवडायचे. आता मात्र नव्या संकल्पना घेऊन बरेच जण उद्योग सुरू करत आहेत. पर्यावरण, खाद्यसंस्कृती अशा स्टार्टअप कंपन्यांमध्ये युवकांना यशाचा मार्ग सापडू शकतो, असा सूर ‘वैविध्यपूर्ण क्षेत्रातील करिअरच्या संधी’ या विषयावरील चर्चासत्रातून निघाला. 

जे. ए. चौधरी, आयटी सल्लागार, तमिळनाडू - स्टार्टअप संकल्पनेमुळे अनेक कंपन्या उभ्या राहात असून, त्यामधून नवीन उद्योग पुढे येत आहेत. मात्र, या कंपन्यांना अपेक्षित व्यासपीठ आणि पाठिंबा मिळताना दिसत नाही. त्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्‍यकता आहे. जागतिक पातळीवर अनेक कंपन्या यशस्वी झाल्या असल्या, तरी त्याच्या उभारणीसाठी मोठे प्रयत्न झाले आहेत. स्टार्टअपमध्येदेखील तशाच पद्धतीचा अवलंब होण्याची आवश्‍यकता आहे. 

 नव्या बदलांमुळे राष्ट्राच्या विकासामध्ये हातभार लागणार
 डिजिटल तंत्रज्ञानाच्या विस्ताराचा चांगला फायदा
 स्टार्टअप कंपन्यांना गती देण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज

विष्णू मनोहर, विष्णूजी की रसोई - मी डॉक्‍टर किंवा इंजिनिअर व्हावे, अशी घरच्यांची इच्छा होती. मात्र, मी वेगळे क्षेत्र निवडल्यामुळे ते नाराज झाले होते. आपल्याला ज्या क्षेत्रात काम करायला आवडते, त्यामध्ये काम केले तर यशप्राप्ती चांगली होते. नेहमीच्या क्षेत्रापेक्षा वेगळ्या धाटणीची वाट निवडली आणि त्यामध्ये मनापासून काम केले तर मिळणारा आनंद खूपच वेगळा असतो. शेफ म्हणून काम करताना केलेल्या उपक्रमांचे लोकांनी कौतुक केले आहे.

 नवीन क्षेत्रात करिअरच्या भरपूर संधी 
 अशा उपक्रमांमुळे स्मार्ट सिटीला गती मिळणार 
 प्रयोगशीलतेला कायम महत्त्व असावे 
 आवडीच्या क्षेत्रात काम करण्याचा आनंद अवर्णनीय

लोव्हिना लिओनार्डो, संस्थापिका, एव्हरिथिंग एक्‍सपेक्‍टस्‌ - भारतात शिक्षण घेऊन मी अमेरिकेत राहिलेली असले, तरी देशावरील अभिमानापोटी पुन्हा येथे आली. नव्या संकल्पनेवर आधारित कंपनी सुरू केली आहे. तरुणांना अनेक क्षेत्रात चांगल्या संधी आहेत. मात्र, त्यांनी त्याचा लाभ घेण्याची गरज आहे. तुमच्याकडे एखादी चांगली कला असेल त्याच्या आधारावर तुम्ही करिअर करू शकता. त्यासाठी तुम्ही विचार करण्याची गरज आहे. 

 नव्या संकल्पनेतून तयार केलेल्या कंपनीमध्ये एकाच छत्राखाली सुविधा
 सिटी ओरिएंटेशनपासून शाळा कशी सुरू कराल अशा उपक्रमांचा समावेश 
 नव्या कामातून मिळणारा आनंद वेगळाच 

क्रिस रोझारिओ, संस्थापक, मायपेट - प्लॅस्टिक ही समस्या देशभर मोठी झाली आहे. प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर करणारी यंत्रणा उभारण्याचा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. केंद्र सरकारकडून त्याचे कौतुक झाले आहे. अनेक महापालिका त्या राबवीतदेखील आहेत. थोडक्‍यात काय, सध्या काय चालू शकते, याचा विचार करून तुम्ही जर काम केले तर त्याला नक्‍कीच यश मिळते. 

 या अनोख्या यंत्रणेमुळे प्लॅस्टिकचा प्रश्‍न सुटण्यास मदत 
 यामधून रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध
 नवीन तंत्रज्ञान, शिक्षण आणि पर्यावरणाचे संरक्षण यामधून शक्‍य
 मागणीनुसार पुरवठा करणे महत्त्वाचे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com