बारामती पालिकेच्या सर्वसाधारण सभेत चर्चेविना पंधरा विषय मंजूर 

baramati9
baramati9

बारामती (पुणे) :  नगरसेवकांमधील अंतर्गत गटबाजीचा फटका आजच्या सर्वसाधारण बैठकीला बसल्याचे स्पष्ट झाले.  बैठकीत चर्चेविना पंधरा विषय मंजूर करण्यात आले. या बैठकीवर नगरसेवकांमधील अंतर्गत कलहाचे सावट स्पष्टपणे दिसले. 

नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे या बैठकीस अनुपस्थित राहिल्याने उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ यांच्या अध्यक्षतेखाली आजची बैठक काही मिनिटातच संपविली गेली. सकाळी झालेल्या पक्षाच्या बैठकीत नगरसेवकांसह नगराध्यक्षांमध्येही काही विषयांवरुन वाद झालेले होते. या बैठकीमध्ये नगराध्यक्षा एकट्या पडल्याचे चित्र निर्माण झाले होते. अनेक मुद्यांवरुन नगरसेवकांनी नगराध्यक्षांना घेरण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या वेळेस अजित पवार यांच्या समोर त्यांच्या मदतीसाठी कोणीही आले नाही, अशी माहिती पुढे येत आहे. नगरसेवकांमधील कलह पवार यांच्या समोर आल्यानंतर अजित पवारही चिडले होते. त्यामुळे या बैठकीनंतर नगराध्यक्षा काहीशा अस्वस्थपणे निघून गेल्या होत्या. 

दुपारी चारच्या बैठकीकडेही त्यांनी पाठ फिरवल्यानंतर त्या कमालीच्या नाराज आहेत, हे स्पष्ट झाले होते. अनेक नगरसेवक बैठकीस येईपर्यंत राष्ट्रगीतही संपून गेलेले होते. नगराध्यक्षांशी या बाबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. 
 
नगराध्यक्षांच्या राजीनाम्याची चर्चा... 

बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे अंतर्गत गटबाजीला कंटाळून राजीनामा देण्याच्या मनःस्थितीत असल्याची जोरदार चर्चा होती. आजच्या बैठकीची अनुपस्थिती त्यांची नाराजी दर्शविण्यास पुरेशी होती. अजित पवार यांनी एकीने काम करण्याचा संदेश दिल्यानंतर आता नगरसेवक यात काय भूमिका घेतात याकडेच बारामतीकरांचे लक्ष आहे. 
 
अजित पवार यांना अभिप्रेत असलेल्या बारामतीचे स्वप्न साकारण्यासाठी सर्व नगरसेवक एकदिलाने काम करणार आहोत. विकासकामे वेगाने मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. अजित पवार यांच्या सूचनांनुसार कामे करण्यास प्रारंभ केला आहे. 
- सचिन सातव, गटनेते, बारामती नगरपालिका 
 
पंधरा विषय मंजूर 
सर्वसाधारण सभेत महत्त्वाचे विषय चर्चेला होते. मात्र या विषयांवर फारशी चर्चा झालीच नाही. विरोधी नगरसेवक सुनील सस्ते व विष्णुपंत चौधर यांनी एका ओळीच्या ठरावाने विषय मंजुरीला विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, राष्ट्रवादीकडे बहुमत असल्याने बहुमताच्या जोरावर त्यांनी 15 विषय मंजूर करुन घेतले. 
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com