'परीक्षा पुढे ढकलाव्यात' असंच वाटतंय विद्यार्थ्यांना; सर्व्हेतून पुढे आली माहिती

Exam_Students
Exam_Students

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नीट, जेईई या देश पातळीवरील आणि एमएच-सीईटी ही राज्य पातळीवरील परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, असे जवळपास ५० टक्के विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. तर ३७ टक्के विद्यार्थ्यांना या परीक्षा वेळेत व्हाव्यात, असे वाटत आहे.

यंदा नीट परीक्षा १३ सप्टेंबर रोजी, तर दुसऱ्या टप्प्यातील जेईई मेन परीक्षा एक ते सहा सप्टेंबर दरम्यान होणार आहे. या परीक्षा पुढे ढकलण्यासाठी विद्यार्थ्यांनी केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यानंतर विविध भागातून मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. कोरोनाची वाढती रुग्ण संख्या आणि विविध भागांतील पूरस्थिती; त्याचप्रमाणे खेड्यापाड्यातून केंद्र असलेल्या ठिकाणी पोचण्यासाठी असणारी असुविधा या पार्श्वभूमीवर या परीक्षा दिवाळीनंतर घेण्यात याव्यात, अशी काही विद्यार्थ्यांची मागणी आहे. 

या पार्श्वभूमीवर 'डीपर' या शैक्षणिक व्यासपीठातर्फे 'या परीक्षा व्हाव्यात की नाही?,' याबाबत विद्यार्थ्यांना सर्वेक्षणातून प्रश्न विचारुन कल जाणून घेण्यात आला. यात जवळपास तीन हजार ५६० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना जेईई, नीट या परीक्षा व्हाव्यात, असे विचारले असता, त्यातील जवळपास ५० टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, असे मत मांडले. तर ३७ टक्के विद्यार्थ्यांना या परीक्षा वेळेवर व्हाव्यात, असे वाटत आहे. तर १३ टक्के विद्यार्थ्यांना यावर काहीही भाष्य करायचे नाही. या सर्वेक्षणामध्ये विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्ष हे एक जानेवारी २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ असे व्हावे का? असे विचारले असता ६० टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी त्यासाठी प्रसंती दर्शवली आहे.

"एकीकडे या परीक्षांना सामोरे जाताना विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होण्याची भीती ही टांगती तलवार आहे. तर दुसरीकडे ही परीक्षा पुढे ढकलली गेली, तर मात्र विद्यार्थ्यांच्या पुढील वर्षाच्या नवीन सत्राचा प्रश्न निर्माण होणार आहे. यातून विद्यार्थ्यांच्या हिताचा मार्ग काढणे महत्त्वाचे ठरणार आहे."
- हरीश बुटले, संस्थापक सचिव, डीपर

"जेईई मेन परीक्षा झाली, तर अधिकाधिक चांगल्या संस्थेत अभियांत्रिकी शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे ही परीक्षा झाली पाहिजे. फक्त सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सगळ्या विद्यार्थ्यांचा विचार करता ही परीक्षा किमान दोन महिने तरी पुढे ढकलण्यात यावी."
- एक परीक्षार्थी विद्यार्थी

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com