शिरूरवर कोरोनाचे सावट गडद, बाधितांनी ओलांडला पन्नासचा टप्पा 

नितीन बारवकर
मंगळवार, 30 जून 2020

शिरुर शहर व परिसरात गेल्या दोन दिवसात पाच कोरोनाबाधित आढळल्याने शहरावरील कोरोनाचे सावट गडद होताना दिसत आहे.

शिरुर (पुणे) : शिरूर शहर व तालुक्यातील कोरोना रुग्णांनी आज पन्नासचा टप्पा गाठला. शिरुर शहर व परिसरात गेल्या दोन दिवसात पाच कोरोनाबाधित आढळल्याने शहरावरील कोरोनाचे सावट गडद होताना दिसत आहे. एकूण रुग्णांपैकी रांजणगाव एमआयडीसीतील विविध कंपन्यात कार्यरत असलेल्या कामगारांची संख्या अधिक असल्याने औद्योगिक क्षेत्रातही खळबळ उडाली आहे.

पुणे : लग्न समारंभांना होतीये गर्दी; शासनाच्या निर्णयाला केराची टोपली...

शिरूर शहराच्या परिसरातील बाफनानगर येथील एक शिक्षक बाधित आढळल्यानंतर त्यांच्या संपर्कातील नऊ जणांची तपासणी केली असता त्यातील तिघे बाधित आढळले. त्या पाठोपाठ बाबूराव नगरमधील कामगाराचा काल; तर पाषाण मळा येथील एका कामगाराचा कोरोनाचा रिपोर्ट आज पाॅझिटिव्ह आला. त्यामुळे कोरोनाबाधितांनी पन्नासचा टप्पा पूर्ण केला. आजही एका कंपनी कामगाराच्या मुलाचा रिपोर्ट पाॅझिटिव्ह आला. त्यामुळे तालुक्यात आजअखेर एकूण 51 जणांना कोरोनाने ग्रासले असल्याचे स्पष्ट झाले आहे. यात 32 पुरुष व 18 महिलांचा समावेश असून, यामध्ये दहा वर्षाखालील पाच मुले; तर साठ वर्षावरील दहा ज्येष्ठांचा समावेश आहे.

पंढरपूरच्या विठ्ठलाची भक्ती आणि नियोजनबद्ध धावपळ; वाचा तुम्हाला माहिती नसलेल्या सुप्रिया सुळे

शिरूर तालुक्यातील सणसवाङी येथे 23 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर तालुक्याच्या 14 गावातील 51 जणांना बाधा झाली. यापैकी 38 रूग्ण स्थानिक; तर 12 जण हे पुणे किंवा मुंबई येथून आलेले होते. तालुक्यात आतापर्यंत कोरोनामुळे शिरूर शहर, कारेगाव, शिक्रापूर, तळेगाव ढमढेरे व कवठे येमाई येथील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला असून, या पाचही जणांना कोरोना व्यतिरिक्त इतर आजार असल्याचे तपासणीमधून स्पष्ट झाले आहे. कोरोनाग्रस्तांपैकी शहरातील एक व तालुक्याच्या ग्रामीण भागातील 33, असे 34 जण ठणठणीत झाले असून, 11 जणांवर अद्याप उपचार चालू आहेत. तालुक्याच्या विविध भागातील कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातील किंवा लक्षणे आढळलेल्या 434 जणांच्या स्वॅबचे नमुने घेतले होते. त्यापैकी 371 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह; तर 15 पाॅझिटिव्ह आले असून, उर्वरित अहवाल येणे बाकी आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. आर. डी. शिंदे यांनी दिली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 

एमआयडीसीतील कामगारांना धोका
शिरूर तालुक्यातील 51 कोरोनाग्रस्तांपैकी 12 कामगार असून, रांजणगाव एमआयडीसीतील विविध कंपन्यांमधून ते कार्यरत होते. या कंपन्यांमध्ये पुण्याहून कामाला येणारांची संख्या मोठी असून, त्यांच्या संपर्कातून हे कामगार बाधित झाले असावेत, असा आरोग्य विभागाचा प्राथमिक अंदाज आहे.

पुण्यातील बाधित परिसरातून; तसेच 'हाॅटस्पाॅट'मधून देखील येथे विविध कंपन्यात कामगार कामाला येत असल्याची स्थानिक कामगारांची तक्रार आहे. मात्र, प्रशासनाकङून त्या बाबत खबरदारी घेतली न गेल्यामुळे कोरोना चा प्रादूर्भाव वाढल्याचा संशय आहे.  कंपन्यांमधे प्रवेश देताना मास्कची सक्ती,  प्रवेशद्वाराजवळ हातावर सॅनिटायझर देण्याबाबत प्रशासनाने कडक सूचना दिल्या होत्या. मात्र, कंपनीवाल्यांनी या सूचनांकडे दूर्लक्ष केल्यानेच ही साखळी वाढत चालल्याचे चित्र आहे. आता कंपनीतील कामगारांबरोबरच त्यांच्या पत्नी व मुलांनाही कोरोनाची बाधा होत असल्याचे प्रकार पुढे येत आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fifty corona patients in Shirur taluka